आरोग्य विभागातील रिक्त ११,५०० जागांचा प्रश्न महिनाभरात निकाली; वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांची ग्वाही
By विजय.सैतवाल | Published: October 15, 2022 05:26 PM2022-10-15T17:26:02+5:302022-10-15T17:26:12+5:30
शिक्षकांच्याही ५० हजार जागांची लवकरच भरती
जळगाव : राज्यभरात आरोग्य विभागामध्ये परिचारिकांसह वेगवेगळ्या पदांच्या ११ हजार ५०० जागा रिक्त असून त्याविषयी येत्या सोमवारी अंतिम निर्णय होऊन महिनाभरात पात्र उमेदवारांची यादी प्रसिद्ध करीत भरती प्रक्रिया पूर्ण केली जाईल, अशी ग्वाही वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी दिली. यासोबतच शिक्षकांच्या रिक्त असलेल्या ५० हजार जागादेखील लवकरच भरल्या जातील, असेही महाजन यांनी ‘लोकमत’ भेटीदरम्यान सांगितले.
जळगावातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील रिक्त जागांविषयी महाजन यांना विचारले असता त्यांनी संपूर्ण राज्यभरात असलेल्या रिक्त जागांविषयी माहिती देताना सांगितले की, आरोग्य विभागातील ११ हजार ५०० जागा रिक्त आहेत. त्यासाठी ११ लाख अर्ज आले आहेत, मात्र त्याकडे महाविकास आघाडी सरकारने एवढ्या वर्ष लक्ष दिलेच नाही व ही भरती होऊ शकली नसल्याचे ते म्हणाले. मात्र आता या जागा भरण्यासाठी येत्या सोमवारी बैठक घेणार असून संबंधितांना सूचना देऊन त्याचदिवशी माझी त्यावर स्वाक्षरी घेण्याचे कळविले असल्याचे महाजन म्हणाले. महिनाभरात ही भरती प्रक्रिया पूर्ण करून उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध केली जाणार असल्याचे सांगितले.
शिक्षण विभागातीलही ‘बॅकलॉग’ लागणार मार्गी
आरोग्य विभागासह शिक्षकांच्यादेखील जवळपास ४० ते ५० हजार जागा रिक्त असून त्यादेखील लवकरच भरण्यात येणार असल्याचे महाजन यांनी सांगितले. शिक्षक भरती हा विषयी शिक्षण विभागाचा असला तरी आपल्याकडे ग्रामविकास खाते असल्याने जिल्हा परिषदेशी तो निगडीत आहे. त्यामुळे शिक्षणमंत्र्यांशी आपण यावर चर्चा केली असून त्याविषयीचे सर्व प्रश्न लवकरच मार्गी लावले जातील, असे महाजन म्हणाले.