वॉटरमीटरचा विषय तत्कालीन राज्य शासनाने केला रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2020 04:33 AM2020-12-15T04:33:15+5:302020-12-15T04:33:15+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : अमृत योजनेतंर्गत पाणीपुरवठा योजनेच्या निविदेत मनपाने आपल्या निविदेत वॉटरमीटरचा उल्लेख केला नसल्याचा आरोप जळगाव ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : अमृत योजनेतंर्गत पाणीपुरवठा योजनेच्या निविदेत मनपाने आपल्या निविदेत वॉटरमीटरचा उल्लेख केला नसल्याचा आरोप जळगाव फर्स्टचे संचालक डॉ. राधेश्याम चौधरी यांनी केला होता. मात्र,
मनपाने २०१६ मध्येच वॉटरमीटरसाठी लागणाऱ्या ९६ कोटींची तरतूद अमृत योजनेत करण्याबाबतचा ठराव केला असल्याचा खुलासा शिवसेनेचे नगरसेवक प्रशांत नाईक यांनी केला असून, याबाबतचा ठरावाची प्रतदेखील
नाईक यांनी सोशल मीडियावर व्हायरल केली आहे. वॉटरमीटरबाबत मनपाने दिलेला प्रस्ताव राज्यात असलेल्या तत्कालीन भाजप सरकारने रद्द केंद्राकडे पाठविताना रद्द केल्याचाही आरोप नाईक यांनी केला आहे.
सोशल मीडियावर नाईक यांनी डॉ. राधेश्याम चौधरी यांच्या आरोपांना उत्तर दिले आहे. जळगाव फर्स्टकडून वॉटरमीटरचा उल्लेख निविदेत नसल्याचे सांगितले जात होते. मात्र, हा दावा खोटा असून, अमृत योजनेचा पूर्ण प्रस्ताव तयार करताना तत्कालीन खाविआच्या महापौरांनी ४०८ कोटींचा प्रस्ताव तयार केला होता. यामध्ये वॉटरमीटरसाठी ९६ कोटींची तरतूददेखील केली होती. महासभेत हा ठराव बहुमताने मंजूरदेखील करण्यात आला होता. मात्र, राज्य शासनाने केंद्र शासनाकडे
प्रस्ताव सादर करताना वॉटरमीटरचा मुद्दाच काढून घेतला असल्याचे नाईक यांनी सांगितले. तसेच आता वॉटरमीटरच्या कामासाठी खासदार उन्मेष पाटील यांनी केंद्राकडे पाठपुरावा करावा, अशी मागणी प्रशांत नाईक यांनी केली आहे.