‘वोट’ देणे अधिकार आणि कर्तव्य पण !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2019 04:09 PM2019-10-14T16:09:12+5:302019-10-14T16:10:07+5:30
रांगोळीतून मतदान जनजागृती : पालकांनी घेतली मतदानाची प्रतिज्ञा
जळगाव- नागरिकांनी विधानसभा निवडणुकीमध्ये लोकशाहीला बळकट करण्यासाठी मतदानाचा हक्क बजवावा, याकरिता मानव सेवा विद्यालयातील विद्यालयात रांगोळीच्या माध्यमातून ‘वोट’ देणे अधिकार पण आहे व ‘वोट’ देणे कर्तव्य पण आहे, असे संदेश देवून मतदानाविषयी जनजागृती करण्यात आली.
प्रशासनासह शाळा, महाविद्यालय व सामाजिक संघटनांकडून शहरामध्ये पथनाट्य, स्पर्धा तसेच विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून विधानसभा निवडणुकीसाठी मतदार जनजागृती करण्यात येत आहे. त्यातंर्गत शाळांमधील पालकांमध्ये व नागरिकांमध्ये मतदान जनजागृती व्हावी, म्हणून सोमवारी मानवसेवा विद्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ ‘वोट’ देणे अधिकार पण आहे व ‘वोट’ देणे कर्तव्य पण आहे, असा संदेश देणारी भव्य रांगोळी काढण्यात आली. नंतर परिसरातील मतदान जनजागृती रॅली काढण्यात आली. त्यानंतर मतदानाची प्रतिज्ञा घेण्यात आल्यानंतर चित्रकला व रांगोळी स्पर्धा विद्यालयात पार पडली. यामध्ये असंख्य विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. या कार्यक्रमासाठी मुख्याध्यापिका माया अंबटकर, मुक्ता पाटील यांच्यासह सुनील दाभाडे यांनी परिश्रम घेतले़ तसेच विद्यार्थ्यांनी निवडणुकीपर्यंत घरासमोर मतदान जनजागृती करणाऱ्या रांगोळ्या काढव्यात अशा सूचना करण्यात आल्या आहेत.
४०० च्यावर पालकांनी घेतली मतदानाची प्रतिज्ञा
विधानसभा निवडणुकीसाठी लवकरच मतदान होणार आहे, आणि मतदारांनी निर्भीडपणे कुठल्याही आमिषाला बळी न पडता मतदानाचा हक्क बजवावा, यासाठी प.वि.पाटील विद्यालयात पालकसभा पार पडली. यामध्ये तब्बल ४०० च्यावर पालकांनी मतदान करण्याबाबत प्रतिज्ञा घेतली. नंतर मुख्याध्यापिका रेखा पाटील यांनी मतदान जनजागृती केली. तसेच शालेय परिसरातून विद्यार्थ्यांकडून जनजागृती रॅली काढण्यात आली. विद्यार्थ्यांनी विविध घोषवाक्य लिहीलेले पोस्टर हातात पकडून जनजागृती केली.