खान्देशी परंपरेचा ‘कुंभ’मेळा, चैत्र वैशाखनं ऊन.. त्यात आखाजीसारखा सण..!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2018 10:57 AM2018-04-18T10:57:33+5:302018-04-18T10:57:33+5:30
सासुरवाशिणीचा विरंगुळा
संजय हिरे / आॅनलाइन लोकमत
खेडगाव, जि. जळगाव, दि. १८ - चैत्र पौर्णिमेनंतर खान्देशात वेध लागतात ते अक्षयतृतीया अर्थात आखाजीचे. आम्रवृक्षाची चैत्र पालवी, वाऱ्याची हळुवार झुळक हा बदल नुकत्याच लग्न होऊन सासरी गेलेल्या सासुरवाशिणीसाठी माहेरचा सांगावा असतो. वैशाख वणव्याच्या तोंडावर वातावरणातील रुक्षता वाढीस लागलेली असते. माहेरून भाऊ मुºहाळी आलेला असतो. गौराईचे आगमन झालेले असते. आखाजीचा सोहळा सुरू होतो तसा स्री मनाला विरंगुळा यातून मिळतो. उना आखाजीना सण गौरताबाई
भाऊ बहिनले लेवाले गौरताबाई
काळा बाभुयले धजा गौरताबाई
माहेरच्या वाटेवर ऊन मी म्हणत असते. ..तिच्या तोंडून सहजपणे काव्य उमटते-
चैत्र वैशाखन ऊन व माय ऊन
खडके तापुनी झाले लाल लाल व माय
वाळू तापे बालम बाल व माय
माझे गौराईच्या पायी आले फोड व माय
वाटवर कशियान झाड व माय?
वाटवर बकामन झाड व माय
गवराई रमनी घटकाभर व माय
गौराई म्हणजे पार्वती - शंकर. हरी म्हणजे तिचा कन्हेर. सासुरवाशीण आपल्याला गौराईच्या रूपात जणुकाही पाहात आपल्या मनातील भावभावना मोकळ्या करते. आखाजीचा सण निमित्त असते.
आखाजीसारखा सण ..
फुईजी जाऊ मी टीपरना खेवाले
सासरा, मामांजी बठेल व्हता,
लाल देव्हडी गोल चावडीले.
धन्य धन्य पोरी तुले टिपºया खेवाले...
घरकन उनी गिरकी, पडी गऊ धरनीले.
गौराई, आखाजीच्या गाण्यातून माहेर, भाऊ, त्याचे वैभव, दागदागिने याशिवाय पूर्वीच्या बाराबलुतेदार व त्यावर आधारित कृषी संस्कृतीचा अभिमान डोकावत असतो.
आपल्या बंधूच्या शेतातील आम्रवृक्ष, तापी-गिरणा नदी जणुकाही तिच्या बंधुरायाचे वैभवच, म्हणून ती उंचच उंच जाणाºया झोक्यावर बसून गुणगुणते
काया वावरमा झोपाया अंबा,
तठे उतरनी गौराई रंभा
गौराई रंभाले काय काय लेन,
गौराई रंभाले तोडा लेन
माय माले तोडा ली ठेव जो,
बंधु ना हाते दी धाड जो.
याशिवाय गाण्यातून
तापी-गिरणा ना मेय व माय गिरणाना मेय
तठे काय सोनाना पिपय व
माय सोनाना पिपय
तठे काय चांदी न्या
हलकड्या व माय हलकड्या
तठे काय रंगीन पायना व माय पायना
त्यावर नीजे शंकर हरी व माय शंकर हरी.,.
झोका देय गौराई नारी व माय...
घराच्या एका कोनाड्यात बसविलेली गौराई, मुरमुरे, बोरं, डांगराच्या बिया, रोज नवनव्या माळा व रात्री उशिरापर्यंत टिपºया, झोका असा खेळ रंगत असतो. लहान मुली भल्यापहाटे शिवारातील वाहणाºया नदीकाठावरील आंब्याच्या झाडाखाली चला व माय..गौरन पाणी खेवाले... म्हणत स्वच्छंदपणे झिम्मा-फुगडी, वाटेवरील वाटसरूला अडवून पैशांची मागणी व त्यातून खाऊची लयलूट करतात. अन् मग गौराईला निरोप देण्याचा दिवस उजाडतो. एका मुलीला सुटबुट, गाँगल घालत 'मोगल, सजतो. गावातून मिरवणूक निघते.
अरे तु सुटबुटवाला मोगल, मना घर येजो रे
तुले टाकस चंदन पाट, मना घर येजो रे
तुले वाढस केसरी भात, मना घर येजो रे
वरथुन लावसु तुप नी धार, मना घर येजो रे
मिरवणूक दोन गावांच्या सीमेवर येऊन ठेपते. तेथे आधीपासूनच दुसºया गावातील मोगल आपल्या गावातील मुलींच्या लवाजम्यासह डेरेदाखल झालेला असतो. मग मनसोक्त शिव्यांची लाखोली एकमेकांना वाहिली जाते. वर्षभराचा शीण उतरतो. भावनिक कोंडमारा मोकळा होतो! मग सुरू होते दगड-गोट्यांची पत्थरबाजी. सूर्यदेव अस्ताला जायची तयारी करतो तशी गावशिव मोकळी होत जो-तो घराकडे परततो. दुसºया दिवशी गौराई चालनी गंगातीरी व माय... म्हणत गौरी विसर्जन होते. सासरचा घ्यायला आलेला टांगा धूळ उडवत 'ति’च्या गाण्यातील शंकरहरीच्या घरी नेऊन सोडतो. आता मात्र हे सर्व विस्मृतीत गेलेय.
कुठाय कृषी संस्कृतीचा कळवळा?
आखाजी हा सण काही गौराई, झोक्यावरील गाणे व माहेरवाशिणीपुराता मर्यादित नव्हता. येथे पूर्वजांनी बारा बलुतेदांरापासून शेतावर काम करणाºया सालदारांचा विचार करणारी रचना करून ठेवली होती. लोहार, सुतार, शिंपी, न्हावी, कुंभार यांना या दिवसात काम उपलब्ध होत गव्हाईच्या रूपात धान्य व शेतातील निघणाºया शेतमालाचे खळे मिळत असे. आखाजीला खळे कारू-नारूंना वाटप होई. आता रोख पैसा देऊन कामे उरकली जातात. गावातील, घराघरातील छोटी-मोठी कामे करण्यास कारू-नारूंची मदत होई. आता ही चाल जवळजवळ बंद
आखाजीच्या एक महिना आधी सालदार-महिनदार ठरत. गावागावात शे-पाचशे खटले व तेवढेच सालदार पाहायला मिळत. आता गावागावात दोन-चार स्थानिक सालदार राहिलेत. आहे ते सालदार मालदार बनल्याने आता सातपुड्यावर(पावरा मजूर) दारोमदार आहे. आखाजीला चांगल्या सालदाराची शोधमोहीम आता थंडावली आहे. जमिनीचे क्षेत्र घटल्याने रोजंदारीवरच भागवले जातेय. पूर्वजांनी आखाजी साजरी करताना घातलेला हा मेळ, कळवळा संपतोय.
पत्ते कुटणाºयांसाठी बाराही महिने आखाजी. नाही म्हटल्यास आखाजीला पत्ते कुटण्याचे वैशिष्ट्य चिटकून आहे.गावोगावी पत्त्यांचे डाव आजही चालतात. काही गावात तर पत्ते कुटणाºयांसाठी जणुकाही बाराही महिने आखाजी असल्यागत पत्त्यांचे डाव चालतात. आखाजी उरली पत्त्यांपुरती असेच चित्र आहे.
पूर्वजांचे मात्र होतेय स्मरण
घरातील पितरांचे स्मरण-पूजन आज मात्र डेरगं भरण्याच्या रूपात आवर्जून खान्देशातील घराघरातून होतेय. यासाठी घागर भरणे, पूजन आदी विधी जिवंत आहे हीच एक पवित्र परंपरा टिकून आहे. आखाजीनिमित्त हेही नसे थोडके असे म्हणण्यास जागा आहे.
एक झोका..चुके आखाजीचा मोका : घराच्या कोनाड्यात गौराई आहे पण झोका, झिम्माफुगडी, गौरचे पाणी खेळण्याचा डाव रंगणे दुर्मीळ झाले आहे. आम्हना टाइमले महिना ना वाये...झोका टांगला जात होता. आता आखाजीच्या दिवशीच तो मारून-मुटकून टांगलेला दिसतो. झोकाच नाही, त्यामुळे आखाजीचे गाणेही विसरत चाललोय, असे सांगणाºया आजीबाई भेटतात तेव्हा आखाजीचे खानदेशपण हरवत चालल्याची खात्री पटते. चैत्र वैशाखनं ऊन.., आथानी कैरी..तथानी कैरी.., आखाजीसारखा सण, सण बाई टिपरना खेवाले..या सहज ओठावर रुळणाºया गाण्यातील एक-दोन कडव्यातच आखाजी अडकून पडलीय हेही तितकेच खरे!
पथराड येथे यात्रोत्सवाची परंपरा
धरणगाव तालुक्यातील पथराड येथे अक्षयतृतीयेला यात्रेची परंपरा आहे. केवळ पथराडच नव्हे तर पंचक्रोशीतील नागरिक या यात्रोत्सवाची आतुरतेने वाट पाहात असतात. त्यानुसार सालाबादाप्रमाणे यंदाही हा मरीआईचा यात्रोत्सव येथे होत आहे. यात्रेत मरीआईला नवस फेडले जातात. सायंकाळी बारागाड्या ओढल्या जातात. या वर्षी बारागाड्या ओढण्याचा मान कैलास नाईक यांना मिळाला आहे.पडतेय.