माता मृत्यू, बालमृत्यूसह तरुणांचेही मृत्यू रोखणे महत्त्वाचे - डॉ. आशीष सातव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2019 12:20 PM2019-04-14T12:20:22+5:302019-04-14T12:21:54+5:30

आरोग्यसेवेच्या व्रताने मेळघाटात होतेय क्रांती

It is important to prevent death of mothers, deaths, infant mortality - Dr. Ashish Satav | माता मृत्यू, बालमृत्यूसह तरुणांचेही मृत्यू रोखणे महत्त्वाचे - डॉ. आशीष सातव

माता मृत्यू, बालमृत्यूसह तरुणांचेही मृत्यू रोखणे महत्त्वाचे - डॉ. आशीष सातव

Next

विजयकुमार सैतवाल

जळगाव : कुपोषण, बालमृत्यू, मातामृत्यू अशा विविध आजार असलेल्या आदिवासी भागात रुग्णसेवा दिल्यास हे आजार नियंत्रणात येऊ शकतात. यात यश येतही आहे. मात्र या भागात तरुणांच्याही मृत्यूचे प्रमाण अधिक असल्याने तेदेखील रोखण्यासाठी सरकारने प्रयत्न करणे गरजेचे आहे, अशी अपेक्षा मेळघाटात रुग्णसेवेचे व्रत घेतलेल्या डॉ. आशीष सातव यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली. या भागात आरोग्य सेवा दिल्यास तेथील रहिवाशांना नवसंजीवनी मिळू शकते, असे मतही त्यांनी व्यक्त करून महिलांना आरोग्याचे धडे दिल्याने त्या सुद्धा रुग्णांवर प्राथमिक उपचार करु लागल्या आहेत, असेही डॉ.सातव म्हणाले.
इंडियन मेडिकल असोसिएशन जळगावच्या (आयएमए) पदग्रहण सोहळ््यानिमित्त डॉ. सातव हे शहरात आले असता त्यांच्याशी ‘लोकमत’ने चर्चा केली. त्यावेळी त्यांच्याशी प्रश्नोत्तराच्या स्वरुपात झालेला हा संवाद...
प्रश्न- रुग्णसेवेसाठी आपण मेळघाट का निवडले?
उत्तर- तेथील रहिवाशांना आरोग्यसेवेची गरज असताना तेथे ही सेवा मिळणे दुरापास्त होत होते. तेथील मृत्यूचे प्रमाण मन हेलावणारे होते. त्यामुळे त्यांनाही जगण्याचा अधिकार आहे. त्यांना चांगले जीवन जगता यावे यासाठी आपण तेथे रुग्णसेवा देण्याचे निश्चित केले.
प्रश्न- यासाठी आपणास कोणाची प्रेरणा मिळाली?
उत्तर- माझे आजोबा वसंतराव उंबटकर यांच्यासह महात्मा गांधी, स्वामी विवेकानंद, डॉ. अभय बंग, प्रकाश आमटे हे आमचे प्रेरणास्थान आहे.
प्रश्न- मेळघाटातील अनुभव कसा आहे?
उत्तर- मेळघाटातील लोक चांगले आहेत. तेथील अनुभवही चांगला आहे. तेथे काम कराल तेवढे कमी आहे. अजून कामाची गरज आहे. तेथील कामामुळे एक अनुभव आला, आपण स्थानिक पातळीवरील समस्या स्थानिक पातळीवरच सोडवू शकतो. यासाठी आम्ही तेथे ‘घरोघरी बाळाची काळजी’ हा उपक्रम राबवित असून त्यास तेथील महिलांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. सरकारने हा उपक्रम सर्वत्र राबविल्यास आदिवासी भागात मातामृत्यू, बालमृत्यूचे प्रमाण कमी होण्यास मोठी मदत होईल.
प्रश्न- मेळघाटात आपले कार्य कसे चालते?
उत्तर- तेथे आम्ही हॉस्पिटल चालवितो. यामध्ये डोळ््यांचे, लहान मुलांचे वेगवेगळे हॉस्पिटल आहे. शिवाय कुपोषण निर्मूलनासाठी उपचार करण्यावर भर असतो. विशेष म्हणजे आम्ही तेथील महिलांनाच प्रशिक्षण दिले असून त्या उपचारही करु शकतात. तसेच मी व माझी पत्नी पाड्यापाड्यावर जाऊनतपासणीकरतो,तेथेचउपचारकरतो.
प्रश्न- मेळघाटात सध्या काय बदल जाणवत आहे ?
उत्तर- मेळघाटातील नागरिकांच्या आरोग्यामध्ये मोठी सुधारणा होत आहे. येथील बालमृत्यूचे प्रमाण दर हजारी साठवर आले आहे. कुपोषण ६० ते ७० टक्क्याने कमी झाले आहे. मात्र ते आणखी नियंत्रणात आणणे गरजेचे आहे. मातामृत्यूचेही प्रमाण कमी झाले आहे. येथील कामामुळे एक विश्वास निर्माण झाला आहे. जे आदिवासी भागात होऊ शकते, ते भारतात कोठेही शक्य आहे. त्यासाठी कामाची गरज आहे. प्रचंड काम बाकी आहे.
प्रश्न- मेळघाटातील तरुणांच्या मृत्यूबाबत काय सांगणार?
उत्तर- मेळघाटात तरुणांच्या मृत्यूचे प्रमाण मोठे होते. तेथे व्यसनुमक्तीसाठी प्रयत्न केल्याने व्यसनमुक्ती होऊ लागली आहे. त्यामुळे तरुणांनाही त्याचे महत्त्व पटू लागले व त्यांच्यात जनजागृती होऊन तरुणांच्या मृत्यूचे प्रमाण आता ५० टक्क्यावर आले आहे. आरोग्याबद्दल त्यांच्यामध्ये जनजागृती केली जात आहे. हे प्रमाण आणखी कमी होण्यासाठी सरकारचाही पुढाकार आवश्यक आहे.
आरोग्याच्या बाबतीत संशोधन आवश्यक
आपल्याकडे जे आजार होतात, साथ पसरते त्यापेक्षा वैद्यकीय शिक्षण फार वेगळे असते. त्यामुळे आपल्याकडे कोणत्या उपचाराची आवश्यकता आहे, त्या बाबत संशोधन होणे गरजेचे आहे. सोबतच मेळघाट सारख्या आदिवासी भागात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करून डॉक्टरांना तेथे उपचारासाठी प्रोत्साहीत केले पाहिजे, अशी अपेक्षा डॉ. आशीष सातव यांनी व्यक्त केली.

Web Title: It is important to prevent death of mothers, deaths, infant mortality - Dr. Ashish Satav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.