पदव्युत्तर अभ्यासक्रम आहे, मग प्रत्येक विषयांसाठी कमीतकमी दोन शिक्षकांची नियुक्ती बंधनकारक !

By सागर दुबे | Published: May 6, 2023 04:09 PM2023-05-06T16:09:14+5:302023-05-06T16:10:01+5:30

विद्या परिषदेच्या बैठकीत निर्णय ; बैठकीत विविध ४८ विषयांवर चर्चा

It is a postgraduate course, then appointment of at least two teachers for each subject is mandatory! | पदव्युत्तर अभ्यासक्रम आहे, मग प्रत्येक विषयांसाठी कमीतकमी दोन शिक्षकांची नियुक्ती बंधनकारक !

पदव्युत्तर अभ्यासक्रम आहे, मग प्रत्येक विषयांसाठी कमीतकमी दोन शिक्षकांची नियुक्ती बंधनकारक !

googlenewsNext

जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाशी संलग्नित ज्या महाविद्यालयांमध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रम राबविले जातात त्या महाविद्यालयांमध्ये प्रत्येक विषयांसाठी कमीतकमी दोन नियमित शिक्षकांची नियुक्ती बंधनकारक करण्याचा निर्णय विद्यापरिषदेच्या बैठकीत घेण्यात आला.

विद्या परिषदेची सभा विद्यापीठाच्या अधिसभागृहात कुलगुरु प्रा.व्ही.एल.माहेश्वरी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी मंचावर प्र-कुलगुरु प्रा.एस.टी.इंगळे व कुलसचिव डॉ. विनोद पाटील उपस्थित होते. या बैठकीत विविध ४८ विषयांवर चर्चा झाली.  पदव्युत्तर अभ्यासक्रम (एम.एस्सी./एम.कॉम./एम.ए./एल.एल.एम./एम.एस.डब्ल्यू.) राबविणाऱ्या महाविद्यालयांमध्ये विद्यापीठ मान्य ४१५(१) नुसार कमीतकमी प्रत्येक विषयांसाठी दोन शिक्षकांची किंवा ५० टक्के शिक्षकांची नियुक्ती करणे बंधनकारक करण्याच्या विषयावर बैठकीत चर्चा झाली.  

अनेक महाविद्यालयांमध्ये या प्रकारची शिक्षकांची नियुक्ती केली नसल्याचे दिसून येते.  पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या उत्तरपत्रिका तपासणीसाठी प्राध्यापक मिळत नाही आणि निकालाला उशीर होतो. पर्यायाने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होते.  त्यामुळे येत्या नव्या शैक्षणिक वर्षापासून महाविद्यालयांमध्ये दोन शिक्षकांची किंवा ५० टक्के शिक्षकांची नियुक्ती बंधनकारक राहील असे कुलगुरु प्रा.माहेश्वरी यांनी स्पष्ट केले. हा ठराव  विद्या परिषदेने एकमताने मंजुर केला.

इंग्रजीसोबत मराठी भाषेतूनही शिक्षण...

विद्यापीठाच्या प्रशाळांमध्ये एम.एस्सी. कॉम्प्युटर सायन्स, एम.ए.भूगोल, एम.एस्सी. मॅथेमॅटीक्स, एम.एङ आणि  बी.बी.ए. या अभ्यासक्रमांसाठी इंग्रजी सोबतच मराठी भाषेतूनही शिक्षण देण्याचा निर्णय विद्या परिषदेच्या आजच्या बैठकीत घेण्यात आला.  उच्च शिक्षण क्षेत्रातील  शिखर संस्थांनी स्थानिक मातृभाषेत विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जावे असा धोरणात्मक निर्णय घेतला आहे. त्या अनुषंगाने कुलगुरु प्रा. माहेश्वरी यांनी प्रा.सतीश कोल्हे यांच्या अध्यक्षतेखाली दुहेरी भाषेतून विद्यापीठ प्रशाळांमध्ये शिक्षण देण्याबाबतची मार्गदर्शक तत्त्वे ठरविण्यासाठी समिती नेमली होती.  त्यानुसार विद्यापीठ प्रशाळांमधील वरील अभ्यासक्रमांसाठी आता इंग्रजी सोबतच मराठीतूनही विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जाणार आहे.  क्रमिक पुस्तके मराठीत तयार करण्याचे काम सुरु करण्यात आले आहे.   दुहेरी भाषेतून शिक्षण देण्यासाठी त्या त्या अभ्यासक्रमासाठी उपलब्ध असलेल्या एकूण जागांच्या २०% जागांवर विद्यार्थ्यांना येत्या शैक्षणिक वर्षापासून प्रवेश दिला जाणार आहे.

२०२३-२४ पासून चार वर्षीय अभ्यासक्रम सुरू

नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार विद्यापीठाच्या संगणकशास्त्र प्रशाळेत बी.एस्सी. कॉम्प्युटर सायन्स आणि सामाजिकशास्त्र प्रशाळेत बी.ए. अर्थशास्त्र हे चार वर्षीय  पदवी अभ्यासक्रम २०२३-२४ या शैक्षणिक वर्षापासून सुरु करण्यास मान्यता देण्यात आली. विद्यापीठातील शिक्षणशास्त्र प्रशाळेचे नाव बदलून आंतर विद्याशाखीय अभ्यास  प्रशाळा असे करण्यासही मान्यता देण्यात आली. विद्यापीठाच्या बहि:स्थ विभागाव्दारे विविध अभ्यासक्रम राबविले जातात.  आता या विभागाव्दारे सुरु असलेली शैक्षणिक व प्रशासकीय कार्यप्रणाली ही आजीवन अध्ययन व विस्तार विभागांतर्गत विलीन करण्यास देखील या बैठकीत विद्या परिषदेने मान्यता दिली.

यांचाही चर्चेमध्ये सहभाग

विविध विषयांवरील चर्चेत अधिष्ठाता प्रा.अनिल डोंगरे, प्रभारी अधिष्ठाता प्राचार्य एस.एस.राजपूत, प्राचार्य अशोक खैरनार, प्रा.एस.टी.भूकन, प्राचार्य अरविंद चौधरी, प्राचार्य मिलिंद बिल्दीकर, प्राचार्य गौरी राणे, डॉ.शिल्पा बेंडाळे, डॉ.केतन नारखेडे, डॉ.राहुल कुलकर्णी, प्रा.संजयकुमार शर्मा,  प्रा.भूपेंद्र केसूर, प्रा.प्रशांत देशमुख, डॉ.एस.आर.सुरळकर, डॉ.गुणवंत सोनवणे आदींनी सहभाग घेतला.

Web Title: It is a postgraduate course, then appointment of at least two teachers for each subject is mandatory!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव