सोमवारी मुद्रांक मिळणे कठीण कारण, विक्रेते करणार धरणे आंदोलन!
By अमित महाबळ | Updated: October 29, 2023 18:12 IST2023-10-29T18:11:18+5:302023-10-29T18:12:27+5:30
राज्य शासन १०० आणि ५०० रुपयांचे मुद्रांक बंद करणार असल्याच्या चर्चेने मुद्रांक विक्रेते व दस्तलेखकांमध्ये निषेधाचे वादळ उठले

सोमवारी मुद्रांक मिळणे कठीण कारण, विक्रेते करणार धरणे आंदोलन!
जळगाव : राज्य शासन १०० आणि ५०० रुपयांचे मुद्रांक बंद करणार असल्याच्या चर्चेने मुद्रांक विक्रेते व दस्तलेखकांमध्ये निषेधाचे वादळ उठले असून, सरकारच्या संभाव्य निर्णयाविरोधात विक्रेत्यांकडून सोमवारी (दि. ३०) तहसील कार्यालयासमोर एकदिवसीय लाक्षणिक धरणे आंदोलन केले जाणार आहे. यामुळे आज मुद्रांक विक्रेत्यांचे कामकाज बंद राहणार आहे.
गेल्या काही दिवसांपासून राज्य सरकार १०० आणि ५०० रुपयांचे दोन्ही मुद्रांक बंद करणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे मुद्रांक विक्रेते व दस्तलेखक यांच्या व्यवसायावर गंडांतर येऊ घातले आहे. या विरोधात आता निषेधाचा सूर उमटायला लागला आहे. हा प्रश्न जनतेसमोर व शासनासमोर मांडण्यासाठी शासनमान्य मुद्रांक विक्रेते अर्ज व दस्तलेखक महासंघ यांच्या नेतृत्वात सोमवारी (दि. ३०) एकदिवसीय धरणे आंदोलन केले जाणार आहे.
... तर फ्रँकिंगसाठी मशिनरी द्या
भविष्यात मुद्रांक विक्री धोरणात बदल होऊन फ्रँकिंग मशीन वापरले जाणार असल्यास हे काम स्टॅम्प वेंडरमार्फत केले जावे, सर्व परवानाधारकांना फ्रँकिंगसाठी आवश्यक असणारी मशिनरी विनामूल्य व विनाअट द्यावी, नवीन प्रशासकीय इमारतीत मुद्रांक विक्रेते यांना कायमस्वरूपी बसण्याची जागा द्यावी, मुद्रांक विक्रेते अर्ज व दस्तलेखक बांधव यांचे पुनर्वसनासाठी महामंडळाची स्थापना करावी, आदी मागण्या विक्रेत्यांच्या संघटनेमार्फत करण्यात आल्या आहेत.
सरकारकडे मागण्या
१०० आणि ५०० रुपयांचे मुद्रांक बंद करू नये, मुद्रांक विक्रेते यांच्या वारसांना परवाने हस्तांतरित करून मिळावे, मुद्रांक विक्रीचे कमिशन तीन टक्क्यांऐवजी ५ टक्के किंवा १० टक्के करावे किंवा सेवाशुल्क आकारण्यास परवानगी मिळावी, मुद्रांक विक्रीची मर्यादा १० हजार रुपये वरून एक लाख रुपयांपर्यंत मिळावी, अशी मागणी मुद्रांक विक्रेत्यांची असल्याचे शासमान्य मुद्रांक विक्रेते अर्ज व दस्तलेखक महासंघाचे जळगाव जिल्हाध्यक्ष तथा अखिल महाराष्ट्र मुद्रांक समितीचे राज्य सदस्य वासुदेव चव्हाण यांनी म्हटले आहे.
जळगाव जिल्ह्यात ८०० वर मुद्रांक विक्रेते
जळगाव जिल्ह्यात ८००, तर जळगाव शहरात १०० पेक्षा अधिक मुद्रांक विक्रेते आहेत. प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी तहसील कार्यालयासमोर सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत आंदोलन केले जाणार आहे. मुद्रांक बंद करण्याबाबत मंत्री, अधिकारी यांच्याकडून विसंगत माहिती समोर येत असल्याने विक्रेत्यांमध्ये नाराजी पसरली आहे, असे वासुदेव चव्हाण यांनी सांगितले.