मनपाची परवानगी न घेताच झाडं तोडणे पडले महागात; दंडाचीही रक्कम न भरल्याने गुन्हा दाखल
By Ajay.patil | Published: June 16, 2023 07:00 PM2023-06-16T19:00:29+5:302023-06-16T19:00:45+5:30
खेडी शिवारातील गट नंबर ४८/१ मधील मोकळ्या जागेवर असलेले दोन निंबाची झाडे लावली होती.
जळगाव : खेडी शिवारात महापालिकेची कोणतीही परवानगी न घेताच, झाडं तोडल्याप्रकरणी महापालिका प्रशासनाकडून चंद्रकांत पांडूरंग जोशी (रा. खेडी परिसर) यांच्यावर एमआयडीसी पोलिस स्टेशनमध्ये पर्यावरण संरक्षण अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खेडी शिवारातील गट नंबर ४८/१ मधील मोकळ्या जागेवर असलेले दोन निंबाची झाडे लावली होती. चंद्रकांत पांडूरंग जोशी (रा. खेडी परिसर) यांनी ६ एप्रिल रोजी दुपारी १ वाजता या दोन निंबाची झाडे व एका झाडाची फांदी तोडून टाकली. यासंदर्भात जळगाव महापालिकेने चंद्रकांत जोशी यांना २५ हजारांच्या दंडाची नोटीस बजावली होती. ही रक्कम पंधरा दिवसांच्या आत मनपाकडे जमा करायची होती.
मात्र, मनपाकडून वारंवार संबंधित व्यक्तीला नोटिसा देऊन देखील दंडाची रक्कम न भरल्याने प्रभाग समिती अधिकारी बाळासाहेब बळवंतराव चव्हाण यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार चंद्रकांत जोशी यांच्या विरोधात पर्यावरण संरक्षण अधिनियम कायद्यांतर्गत एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस नाईक दत्तात्रय पोटे करीत आहेत.