'आचार्य अत्रे यांच्यासारख्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाच्या नावाने पुरस्कार मिळणे हे माझे भाग्य', ज्येष्ठ कवी ना. धों. महानोर यांची भावना

By अमित महाबळ | Published: August 14, 2022 12:17 AM2022-08-14T00:17:21+5:302022-08-14T00:17:43+5:30

jalgaon News: आचार्य अत्रे यांच्यासारख्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाच्या नावाने मला पुरस्कार मिळणे हे मी माझे भाग्य समजतो, अशा शब्दात ज्येष्ठ कवी व पद्मश्री ना. धों. महानोर यांनी आपली भावना व्यक्त केली.

'It is my fortune to receive an award in the name of a great personality like Acharya Atre', senior poet No. wash Mahanor's sentiments | 'आचार्य अत्रे यांच्यासारख्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाच्या नावाने पुरस्कार मिळणे हे माझे भाग्य', ज्येष्ठ कवी ना. धों. महानोर यांची भावना

'आचार्य अत्रे यांच्यासारख्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाच्या नावाने पुरस्कार मिळणे हे माझे भाग्य', ज्येष्ठ कवी ना. धों. महानोर यांची भावना

googlenewsNext

- अमित महाबळ
 जळगाव : आचार्य अत्रे यांच्यासारख्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाच्या नावाने मला पुरस्कार मिळणे हे मी माझे भाग्य समजतो, अशा शब्दात ज्येष्ठ कवी व पद्मश्री ना. धों. महानोर यांनी आपली भावना व्यक्त केली. ‘आत्रेय’तर्फे आयोजित ‘आचार्य अत्रे मानचिन्ह २०२२’ प्रदान समारंभात सन्मानाला उत्तर देताना ते बोलत होते. शनिवारी, गांधी तीर्थ येथील कस्तुरबा सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

व्यासपीठावर जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन, आमदार शिरीष चौधरी, ॲड. राजेंद्र पै, ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांची प्रमुख उपस्थिती होती. मंचावरील मान्यवर आणि आचार्य अत्रे यांचे पणतू अक्षय पै यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.

अशोक जैन यांच्या हस्ते आचार्य अत्रे मानचिन्ह ना. धों. महानोर यांना प्रदान करण्यात आले. या सन्मानाला उत्तर देताना महानोर म्हणाले, की साहित्याच्या वाटचालीत आचार्य अत्रे व बालकवी ठोंबरे यांनी मला मोठे केले. उत्तुंग व्यक्तिमत्वाच्या नावाने पुरस्कार मिळणे हे भाग्य समजतो. मी, हा पुरस्कार नम्रतापूर्वक स्वीकारतो आणि अत्रेंच्या सार्वभौम व्यक्तिमत्वाला नमस्कार करतो. आजच्या कार्यक्रमप्रसंगी जिवलग मित्र भवरलाल जैन आपल्यात नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

मन स्वच्छ झाले पाहिजे
‘श्यामची आई’ चित्रपटाचा संदर्भ देत महानोर यांनी मन स्वच्छ झाले नाही, त्याची आंघोळ झाली नाही, ते शुद्ध झाले नाही तर काय कामाचे या संवादांचा उल्लेख केला.

हा बेजबाबदारपणा
१९९० पासून ते आजपर्यंत महात्मा फुले यांच्यावर चित्रपट निघाला नाही. हा चित्रपट निघावा, असे ठरले त्यावेळीच त्यासाठी पैसे बाजूला काढण्यात आले होते. इतक्या वर्षात आठ मुख्यमंत्री झाले. पण फुलेंवर चित्रपट न निघणे हा बेजबाबदारपणा कोणाचा म्हणावा, असा मुद्दाही त्यांनी मांडला. मी कोणाचे नाव घेणार नाही, असेही ते म्हणाले.

अत्रे, महानोर यांच्यात अनेक साम्यस्थळे
अशोक जैन यांनी आचार्य अत्रे व ना. धों. महानोर यांच्यात अनेक साम्यस्थळे असल्याचा उल्लेख केला. ना. धों. महानोर म्हणजे विलक्षण शब्द सामर्थ्य असलेला कवी, शेतकऱ्यांचा मार्गदर्शक, गावगाड्यांचा अभ्यासक होय. मराठी भाषा, साहित्य संवर्धनात त्यांचे योगदान मोलाचे असल्याचे सांगितले.

यावेळी आमदार शिरीष चौधरी यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविकात ॲड. राजेंद्र पै यांनी जळगावविषयीच्या आठवणींना उजाळा देत ना. धों. महानोर यांच्याकडे शब्दसामर्थ्य आहे. त्यांची कविता दाद मिळवून जाते. त्यांनी शेती, साहित्य यामध्ये केलेले कार्य अतुलनीय आहे. त्याला तोड नाही, असा उल्लेख केला. कार्यक्रमात इंद्रायणी सावरकर यांच्या संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यावरील पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. व. वा. वाचनालयातर्फे ना. धो. महानोर यांचा सत्कार करण्यात आला. आचार्य अत्रे यांच्या लेखणीतून साकारलेली गीते ‘परिवर्तन’चे अक्षय गजभिये, वैशाली शिरसाळे, सुदीप्ता सरकार यांनी सादर केली. सूत्रसंचालन ज्येष्ठ रंगकर्मी शंभू पाटील यांनी केले. मंजूषा भिडे व हर्षल पाटील यांचे सहकार्य होते.

Web Title: 'It is my fortune to receive an award in the name of a great personality like Acharya Atre', senior poet No. wash Mahanor's sentiments

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव