Jalgaon: अनावश्यक खर्चिक बाबी टाळून लग्न लावणे आवश्यक, सुवर्णकार समाजाच्या वधू-वर मेळाव्यात सूर
By विलास बारी | Published: January 14, 2024 11:11 PM2024-01-14T23:11:33+5:302024-01-14T23:11:53+5:30
Jalgaon: कोणत्याही प्रकारच्या अवाजवी अपेक्षा किंवा दिखाव्याला वधू किंवा वरांच्या पक्षांनी बळी पडू नये, असा सूर सोनार समाजाच्या वधू-वर पालक परिचय मेळाव्यात उमटला. या वेळी ४०० तरुण-तरुणींनी परिचय दिले व किमान १०० विवाह जुळले.
- विलास बारी
जळगाव - जुन्या रूढी परंपरांचा मान ठेवून नवीन पद्धती आत्मसात करणे काळाची गरज असून यामध्ये प्री-वेडिंगसारख्या अनावश्यक खर्चिकबाबी टाळून कमी खर्चात उत्कृष्ट लग्न लावणे आणि उरलेल्या पैशातून नव दाम्पत्यांच्या भविष्याची तरतूद करावी, कोणत्याही प्रकारच्या अवाजवी अपेक्षा किंवा दिखाव्याला वधू किंवा वरांच्या पक्षांनी बळी पडू नये, असा सूर सोनार समाजाच्या वधू-वर पालक परिचय मेळाव्यात उमटला. या वेळी ४०० तरुण-तरुणींनी परिचय दिले व किमान १०० विवाह जुळले.
महाराष्ट्र सुवर्णकार सेनेच्यावतीने रविवारी सोनार समाजाचा वधू-वर पालक परिचय मेळावा छत्रपती संभाजीराजे नाट्यगृह सभागृहात उत्साहात झाला. शहरासह मुंबई, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर तसेच मध्यप्रदेश, सुरत, गुजरात असे विविध ठिकाणाहून तीन हजारापेक्षा जास्त समाजबांधवांनी या मेळाव्यासाठी उपस्थित होते.
आमदार सुरेश भोळे, सिंधू वाघ, माजी आमदार जयप्रकाश बाविस्कर, सिनेअभिनेत्री मयुरी वाघ, नगरसेविका रंजना वानखेडे, स्वागताध्यक्ष विजय विसपुते, विजय सोनार, कल्पेश सोनार, विजय वानखेडे, अरूण वडनेरे, मेळावा प्रमुख दीपक जगदाळे, उपप्रमुख भगवान दुसाने, नियोजन समिती प्रमुख शाम भामरे, सचिव प्रशांत विसपुते, सहसचिव शशिकांत जाधव, सुभाष सोनार यांच्याहस्ते प्रतिमापूजन व दीपप्रज्वलनाने उद्घाटन झाले.
सर्व मान्यवरांच्याहस्ते सोनार समाजाच्या वधू-वर परिचय पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. सूत्रसंचालन रत्नकुमार थोरात, राजश्री पगार, संजय दुसाने, अॅड. केतन सोनार यांनी तर महाराष्ट्र सुवर्णकार सेनेचे सचिव संजय पगार यांनी आभार व्यक्त केले.