मुक्ताई कारखाना क्षेत्रात ऊस लागवड केल्यास अठराशेपेक्षा अधिक भाव देणे शक्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2018 07:54 PM2018-12-24T19:54:02+5:302018-12-24T19:57:32+5:30
संत मुक्ताई साखर कारखाना परिसरात जास्तीत जास्त प्रमाणात ऊस लागवड केल्यास वाहतूक बचत होऊन शेतकऱ्यांना अठराशेपेक्षा अधिक भाव देणे शक्य होईल, असे प्रतिपादन माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांनी केले.
मुक्ताईनगर, जि.जळगाव : संत मुक्ताई साखर कारखाना परिसरात जास्तीत जास्त प्रमाणात ऊस लागवड केल्यास वाहतूक बचत होऊन शेतकऱ्यांना अठराशेपेक्षा अधिक भाव देणे शक्य होईल, असे प्रतिपादन माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांनी केले. कारखान्याच्या पाचव्या गळीत हंगामातील (२०१८-१९) उत्पादित एक लाख एक हजार एकशे एकरा क्विंटल साखरेचे पूजन करताना ते बोलत होते.
यावेळी बाजार समिती सभापती निवृत्ती पाटील, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष विलास धायडे, पं.स. सदस्य विकास पाटील, राजू सवळे, चंद्रकांत भोलाणे, विनोद गवळे, संदीप देशमुख, विश्वनाथ महाजन, रामभाऊ पाटील, प्रेमचंद बढे, पांडुरंग नाफडे उपस्थित होते
या वेळी कारखाना लाभ क्षेत्रातील उपस्थित ऊस उत्पादक शेतकरी बांधवांना मार्गदर्शन करताना खडसे म्हणाले, आपण सर्व ऊस उत्पादक शेतकरी बांधवांनी उसाची लागवड केल्यामुळे कारखाना यशस्वीरितीने पाचवा गळीत हंगाम पार पाडत आहे. कारखाना उसाला एफआरपीपेक्षा जास्त भाव देत आहे. चालू वर्षी कारखान्याने उसाला १८०० भाव दिला आहे. आपण जर कारखाना लाभ क्षेत्रात उसाची जास्त लागवड केली तर वाहतूक खर्चात बचत होऊन उसाला आणखी अधिक भाव देणे शक्य होईल, तेव्हा शेतकरी बांधवांनी ऊस लागवडीकडे वळावे, असे आवाहन केले.
स्थानिक संचालक विलास धायडे यांनी प्रास्ताविका, ‘चालू गळीत हंगामात कारखान्याने आतापर्यंत एक लाख २२ हजार ३३० मेट्रिक टन ऊस गाळप केले असून, एक लाख एक हजार १११ क्विंटल साखर उत्पादित केली असून, ९.०२ चा साखर उतारा आहे. कारखान्याने वीज वितरण कंपनीला एकूण ३९ लाख ४९ हजार २०० कि.वॅट. वीज निर्यात केली आहे’, असे सांगितले.
कार्यक्रम यशस्वितेसाठी मुख्य अभियंता तुकाराम सुरवसे, कृषी अधिकारी मुश्ताक पटेल, रसायन विभागाचे अभियंता के.व्ही.पाटील, गोपाळ पाटील, रवीकुमार भोसले, पंकज पाटील यांनी परिश्रम घेतले.