जळगाव जिल्ह्यात बाराही महिने झाला पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2021 04:12 AM2021-06-05T04:12:54+5:302021-06-05T04:12:54+5:30

हवामान बदलांमुळे पारंपरिक शेतीत बदल करणे गरजेचे : पुढेही राहणार अवकाळीचे संकट; ‘ला-लीना’चा प्रभाव पर्यावरण दिन विशेष अजय पाटील ...

It rained for twelve months in Jalgaon district | जळगाव जिल्ह्यात बाराही महिने झाला पाऊस

जळगाव जिल्ह्यात बाराही महिने झाला पाऊस

Next

हवामान बदलांमुळे पारंपरिक शेतीत बदल करणे गरजेचे : पुढेही राहणार अवकाळीचे संकट; ‘ला-लीना’चा प्रभाव

पर्यावरण दिन विशेष

अजय पाटील

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : गेल्या काही वर्षांपासून हवामानात मोठ्या प्रमाणात बदल होत असल्याने त्याचा परिणाम प्रत्येक ऋतूवर होताना दिसून येत आहे. गेल्या दोन वर्षांपासून जळगाव जिल्ह्यात पावसाची सरासरी वाढली असून, थंडीच्या प्रमाणात मात्र घट झाली आहे. त्यात गेल्या वर्षभरात जळगाव जिल्ह्यात प्रत्येक महिन्यात पावसाने हजेरी लावली आहे. जून ते सप्टेंबर या मान्सूनच्या महिन्याव्यतिरिक्तदेखील प्रत्येक महिन्यात अवकाळी पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

बदलत्या हवामानामुळे आता जिल्ह्यातील शेतकऱ्यांनीदेखील आपल्या पारंपरिक पीक पद्धतीमध्ये बदल करण्याची गरज असल्याचे मत कृषीतज्ज्ञ समाधान पाटील यांनी व्यक्त केले आहे. हवामान बदलामुळे प्रत्येक हंगामावर परिणाम होत असून, पारंपरिक शेती पद्धतीत बदल केला नाही तर शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसानीला सामोरे जाण्याची भीतीदेखील आता कृषी तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.

थंडी कमी, पाऊस जास्त

जिल्ह्यात गेल्या दोन वर्षांपासून बदलत्या हवामानामुळे पावसाचे प्रमाण हे सरासरीपेक्षा ४० टक्‍क्‍यांनी वाढले आहे. तर हिवाळ्यात थंडीचे प्रमाण कमी होऊन, नोव्हेंबर ते फेब्रुवारी या चार महिन्यांत किमान तापमानाची सरासरी ही ३ अंशांनी वाढलेली आहे. जास्त पावसामुळे खरीप हंगामातील मूग, उडीद, सोयाबीन या पिकांना फटका बसत आहे. तर थंडी गायब झाल्यामुळे गहू, हरभरा या रब्बी पिकांच्या उत्पादनावर मोठा परिणाम होताना दिसून येत आहे.

गेल्या दोन वर्षांतील खरीप हंगामाची स्थिती

वर्ष - लागवड - झालेले नुकसान

२०१९ - ७ लाख २० हेक्टर - २५ टक्के

२०२० - ७ लाख २८ हजार हेक्टर -३० टक्के

जून २०२० ते मे २०२१ दरम्यान जिल्ह्यात पडलेला पाऊस

जून -१३८ मिमी

जुलै - १८० मिमी

ऑगस्ट - २२० मिमी

सप्टेंबर - २६९ मिमी

ऑक्टोबर - ११८ मिमी

नोव्हेंबर - ८९ मिमी

डिसेंबर - ९८ मिमी

जानेवारी - ७५ मिमी

फेब्रुवारी - ७० मिमी

मार्च - ७१ मिमी

एप्रिल - ५४ मिमी

मे - ९८ मिमी (सुमारे)

समुद्राच्या तापमानात वाढ झाल्यामुळे निर्माण झाले अवकाळीचे संकट

हवामान बदलाचे परिणाम संपूर्ण जगात पाहायला मिळत असून, जागतिक तापमान वाढले असून, समुद्राच्या पाण्यातील तापमानातदेखील वाढ होत आहे. समुद्राच्या पाण्यावरील १० ते १२ अक्षांशावर व ८२ रेखांशावर पाण्याचे तापमान वाढत असल्याने सातत्याने चक्रीवादळे निर्माण होत आहेत. या चक्रीवादळांमुळे कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊन प्रत्येक महिन्यात महाराष्ट्रासह जळगाव जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली आहे. त्यात अवकाळी पावसाचा समावेश होत आहे.

गेल्या वर्षभरात निर्माण झाली चार वादळे

गेल्या वर्षभरात बंगालच्या उपसागरात व अरबी समुद्रात मिळून चार चक्रीवादळे तयार झाली. त्यात अरबी समुद्रात निर्माण झालेले निसर्ग चक्रीवादळ, हे मान्सूनच्या आधी तयार झाले होते. तर बंगालच्या उपसागरात नोव्हेंबर ते फेब्रुवारी महिन्यापर्यंत एकूण तीन वादळे तयार झाली. यामध्ये निवान, अम्फान आणि बुरेवू या चक्रीवादळांचा समावेश होता. या चक्रीवादळांमुळे निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे जळगाव जिल्ह्यात बाराही महिने पावसाने हजेरी लावली.

कोट..

समुद्राच्या तापमानात होत असलेल्या वाढीमुळे चक्रीवादळे निर्माण होत आहेत. तसेच प्रशांत महासागरात ‘ला-लीना’चा प्रभावदेखील कायम आहे. यामुळे अवकाळी पाऊस वाढला आहे. तसेच मान्सूनच्या पावसाच्या सरासरीतदेखील वाढ होत आहे. सातत्याने निर्माण होत असलेल्या चक्रीवादळामुळे पावसाची सरासरी वाढत असते, तर थंडीचे प्रमाण कमी होत आहे. हवामान बदलामुळे निसर्गाच्या ऋतुचक्रात हे बदल होत आहेत.

- डॉ. रामचंद्र साबळे, हवामान तज्ज्ञ, पुणे

हवामानात होत असलेल्या बदलांमुळे आता शेतकऱ्यांनीदेखील शेतीमध्ये बदल करणे आवश्यक आहे. अवकाळी पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून, पारंपरिक पीक पेरा सोडून इतर पिकांकडे आता शेतकऱ्यांनी वळले पाहिजे.

- समाधान पाटील, कृषितज्ज्ञ, आव्हाणे

Web Title: It rained for twelve months in Jalgaon district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.