शिक्षणातून उत्तम नागरिक घडेल हे शिकवले गेले पाहिजे- डॉ.के.बी.पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2019 06:54 PM2019-12-01T18:54:12+5:302019-12-01T18:55:19+5:30
शिक्षणातून समाजात उत्तमपणे वागायला शिकवणे, उत्तम नागरिक निर्माण करणे हे शिकवले गेले पाहिजे, असे प्रतिपादन कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ.के.बी.पाटील यांनी केले.
चोपडा, जि.जळगाव : शिक्षणातून समाजात उत्तमपणे वागायला शिकवणे, उत्तम नागरिक निर्माण करणे हे शिकवले गेले पाहिजे. उत्तम व्यक्तिमत्व आणि उत्तम समाजजीवनाला शिक्षणाशिवाय दुसरा पर्याय नाही, असे प्रतिपादन कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ.के.बी.पाटील यांनी केले.
चोपडा येथे भगिनी मंडळ संस्थेतर्फे १ डिसेंबर रोजी आयोजित 'सुशील शिक्षक पुरस्कार' वितरणप्रसंगी ते बोलत होते. मंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष उद्योजक आशिष अरुणलाल गुजराथी, भगिनी मंडळाच्या अध्यक्षा पूनम गुजराथी, उपाध्यक्ष छाया गुजराथी, निवृत्त मुख्याध्यापक सुभाष पाटील, नपा गटनेते जीवन चौधरी, नगरसेवक रमेश शिंदे, हुसेन पठाण, जितेंद्र देशमुख, जि.प. सदस्या डॉ.नीलम पाटील, अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. नरेंद्र शिरसाट, संचालिका संध्या गुजराथी, कल्पना पोतदार उपस्थित होते.
भगिनी मंडळ संस्थेच्या माजी अध्यक्षा डॉ.सुशीलाबेन शहा यांच्या जयंतीनिमित्त दिल्या जाणाऱ्या या 'सुशील शिक्षक पुरस्कार' वितरणप्रसंगी ते बोलत होते.
भगिनी मंडळाने पारंपरिक अभ्यासक्रम सुरू न करता व्यावसायिक शिक्षणक्रम सुरू करत एक चांगला प्रयत्न केला आहे. तो भविष्यात कायम राहावा. 'सुशील शिक्षक पुरस्कार' हा इतरांसाठी प्रेरणादायी असल्याचे सांगत डॉ.के.बी.पाटील यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. याप्रसंगी मान्यवरंनी मनोगत व्यक्त केले.
जितेंद्र जोशी यांना 'सुशील शिक्षक पुरस्कार'
भगिनी मंडळ संस्थेच्या संचलित महिला मंडळ वोळूंतरी स्कूलमधील उपशिक्षक जितेंद्र नरेश जोशी यांना माजी डॉ.के.बी.पाटील यांच्या हस्ते पहिला 'सुशील शिक्षक पुरस्कार' प्रदान करण्यात आला. प्रमाणपत्र व रोख रक्कम असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
सूत्रसंचालन संजय बारी यांनी, मान्यवरांचा परिचय डॉ.विष्णू गुंजाळ यांनी करून दिला. प्रारंभी महिला मंडळ माध्यमिक विद्यालय, समाजकार्य महाविद्यालय, स्कूल आॅफ नर्सिंगच्या विद्यार्थिनींनी ईशस्तवन व स्वागतगीत सादर केले. यावेळी शहरासह तालुक्यातील विविध सामाजिक, शैक्षणिक, सहकारी, राजकीय संस्थांचे पदाधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.