सत्ताधारी शिवसेनेच्या नगरसेवकावर आली गवत कापण्याची वेळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 04:12 AM2021-07-20T04:12:36+5:302021-07-20T04:12:36+5:30
मनपाने हात झटकले : सागर पार्कवर गवताचे झाले कुरण ; तक्रारीची दखल घेईना लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शहरातील ...
मनपाने हात झटकले : सागर पार्कवर गवताचे झाले कुरण ; तक्रारीची दखल घेईना
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शहरातील सागर पार्क मैदानावर मनपाकडून जॉगिंग ट्रॅकसह सुशोभिकरणाचे काम हाती घेण्यात आले होते. मात्र, हे काम मध्येच थांबले असून, याठिकाणी आता गवतदेखील वाढले आहे. याबाबत स्थानिक नगरसेवक तथा शिवसेनेचे गटनेते अनंत जोशी यांनी मनपा प्रशासनाकडे तक्रार करून देखील मनपाने कोणतीही दखल घेतली नाही. त्यामुळे सोमवारी नगरसेवक अनंत जोशी यांनी स्वत: याठिकाणचे गवत कापण्याचे काम सुरू केले. तसेच जॉगिंग ट्रॅकलगतचे गवत कापून मनपा प्रशासनाचा निषेध व्यक्त करण्यात आला आहे.
सागर पार्क हे मैदानावर दररोज शेकडो नागरिक जॉगिंग करण्यासाठी तर अनेक युवक खेळण्यासाठी येत असतात. मात्र, या मैदानाकडे मनपा प्रशासनाकडून फारसे लक्ष दिले जात नसल्याचे पहायला मिळत आहे. गवत वाढल्याने याबाबत मनपा प्रशासनाकडे हे गवत काढण्याचा सूचना दिल्या होत्या. मात्र, तरीही मनपाने हे गवत काढले नाही. तसेच हायमास्ट लाईटसाठी सहा महिन्यांपूर्वी याठिकाणी खांब बसविण्यात आले असून, याठिकाणी लाईटची व्यवस्था केली जात नसल्याची तक्रार नगरसेवक अनंत जोशी यांनी केली. विशेष म्हणजे मनपात शिवसेनेची सत्ता असतानादेखील मनपा प्रशासनाकडून नगरसेवकांच्या तक्रारींची दखल घेतली जात नसल्याने गवत कापून मनपाचा निषेध केला आहे. मनपाने अशाचप्रकारे दुर्लक्ष केल्यास मनपाविरोधात तीव्र आंदोलनाचा इशारा जोशी यांनी दिला आहे.