शिक्षकांनीच बोर्डाचे टेन्शन केले हलके; दहावी, बारावी परीक्षेच्या कामकाजात होणार सहभागी
By अमित महाबळ | Published: March 14, 2023 03:46 PM2023-03-14T15:46:43+5:302023-03-14T15:48:04+5:30
जळगाव जिल्ह्यात २३ हजार ६०० नियमित शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी बेमुदत संपात सहभागी आहेत.
जळगाव : दहावी आणि बारावीची परीक्षा सुरू असतानाच जुनी पेन्शन योजना लागू होण्यासाठी सरकारी व निमसरकारी कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला आहे. त्यामध्ये नियमित शिक्षकांचाही सहभाग असला, तरी संपामुळे स्टेट बोर्डाच्या परीक्षांचे कामकाज प्रभावित होऊ देऊ नका, असे आवाहन महाराष्ट्र माध्यमिक शिक्षक संघ (फेडरेशन) यांच्या वतीने करण्यात आले आहे.
जळगाव जिल्ह्यात २३ हजार ६०० नियमित शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी बेमुदत संपात सहभागी आहेत. पण बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा प्रभावित होऊ न देण्याची भूमिका शिक्षक संघटनेने घेतली आहे. महाराष्ट्र माध्यमिक शिक्षक संघाचे (फेडरेशन) अध्यक्ष ज्ञानेश्वर कानडे व सचिव शालिग्राम भिरुड यांनी संपात सहभागी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांना आवाहन करणारे निवेदन प्रसिद्ध केले आहे.
बेमुदत संप असल्याने संपात सहभागी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी शाळेत जायचे नाही, शाळेचे कोणतेही कामकाज करायचे नाही, मस्टरवर सही करायची नाही. पण आपला बोर्डाच्या परीक्षांवर बहिष्कार नसल्यामुळे विद्यार्थी हित लक्षात घेता दहावी व बारावीच्या परीक्षेचे कामकाज काळ्या फिती लावून करावे. बोर्डाच्या परीक्षेच्या उत्तरपत्रिका तपासू नयेत. परीक्षक व नियामक यांनी संप काळात कोणत्याही प्रकारचे कामकाज करू नये, बोर्डाच्या परीक्षेच्या कामकाजाशी संबंध नसलेल्या कोणीही शाळेत उपस्थित राहू नये, शालेय स्तरावर कोणत्याही प्रकारची परीक्षा घेण्यात येऊ नये, त्या संबंधीचे कोणतेही कामकाज करू नये, असे निवेदनात म्हटले आहे.