सर्व सदस्यांना सोबत घेऊन विकासात्मक कामांवर भर देणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2020 12:36 PM2020-01-10T12:36:54+5:302020-01-10T12:37:10+5:30
प्रभारी राज संपविणार : जि़ल्हा परिषदेच्या नवनिर्वाचित अध्यक्षा रंजना पाटील व उपाध्यक्ष लालचंद पाटील यांचा ‘लोकमत’ला दिलेल्या सदिच्छा भेटीत निर्धार
जळगाव : पक्षाने मोठी जबाबदारी दिली आहे. माजी मंत्री एकनाथराव खडसे व आमदार गिरीश महाजन यांच्या मार्गदर्शनाने सर्व सदस्यांना सोबत घेऊन ग्रामीण भागाच्या विकासात्मक कामांवर आगामी अडीच वर्षात अधिक भर देऊ व ही विकासात्मक वाटचाल कायम ठेवू, असा विश्वास जिल्हा परिषदेच्या नवनिर्वाचित अध्यक्षा रंजना पाटील व उपाध्यक्ष लालचंद पाटील यांनी व्यक्त केला आहे़
अध्यक्षा व उपाध्यक्षांनी गुरुवारी दुपारी ‘लोकमत’ शहर कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते. निवासी संपादक मिलिंद कुलकर्णी व सहायक महाव्यवस्थापक गौरव रस्तोगी यांनी त्यांचे स्वागत केले.
प्रभारी राज संपविण्यासाठी प्रयत्न
जिल्हा परिषदेत किती विभागांमध्ये प्रभारी अधिकारी आहेत, याबाबत लवकरच संपूर्ण माहिती घेऊन नेत्यांच्या माध्यमातून वरिष्ठ पातळीवर याचा पाठपुरावा करणार आहे़ शिक्षण विभागाच्या बाबतीतही गांभीर्याने घेऊन तिथे नियमित अधिकारी मिळण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे रंजना पाटील यांनी सांगितले़ भुसावळ तालुक्यात बदल्यांमध्ये झालेले प्रकार, मुक्ताईनगरमध्ये ज्या बदल्या दिल्या गेल्या या सर्वांची चौकशी करून याबाबतचे सत्य समोर आणण्याचा प्रयत्न करणार आहोत़
आगामी काळात विविध प्रश्नांवर सीईओंचे मार्गदर्शन घेऊन ते प्रकल्प सुरू करण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे रंजना पाटील यांनी सांगितले़ छापखान्यासंदर्भातही आम्ही सकारात्मक असून त्याबाबतही लवकरच निर्णय घेऊ, असे लालचंद पाटील यांनी सांगितले़
चांगल्या कामांची पावती
लोकांची कामे करत वाटचाल सुरू आहे़ त्यामुळे आजपर्यंत चांगल्या कामाची पावती मिळाली आहे. सुरुवातीला ग्रामपंचायत निवडणुकीत यश मिळाल्यानंतर चांगल्या कामांमुळे जिल्हा परिषदेत पोहचलो़ नशिराबाद असो किंवा पूर्ण गट कधीही विरोधकांशी असलेल्या मतभेदांचा गावावर किंवा गटाच्या विकासावर कुठलाही परिणाम होणार नाही याची वारंवार काळजी घेतली़ आजही नशिराबाद गावासाठी आम्ही सर्व १९ प्रतिनिधी मिळून कामे करत असतो़ विकास थांबणार नाही, याची दक्षता आम्ही घेत असतो, असे उपाध्यक्ष पाटील म्हणाले़
सदस्य व उपाध्यक्ष अशी तुलना नको
सर्व सदस्यांना आम्ही सांगितले आहे की, तुम्ही सदस्य आम्ही अध्यक्ष, उपाध्यक्ष अशी तुलना न करता सर्वांनी सोबत काम करायचे आहे़ सर्वांना न्याय देण्याची आमची भूमिका राहणार आहे, असेही या पदाधिकाऱ्यांनी सांगितले़