‘मोठं ऑपरेशन आहे, कामाला लागा...’
By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2022 12:23 PM2022-07-02T12:23:44+5:302022-07-02T12:26:26+5:30
फडणवीसांनी त्या वेळी महाजनांच्या कानात काय सांगितले? याबाबत उत्सुकता होती. फडणवीसांनी मिठी मारल्यानंतर कानाजवळ येऊन, ‘मोठं ऑपरेशन आहे, कामाला लागा’, एवढं सांगितले.
अजय पाटील -
जळगाव : विधान परिषदेच्या १० जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपचे सर्व उमेदवार विजयी झाले. सर्व जण आनंदोत्सव साजरा करत होते. त्याचवेळी विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नेत्यांमधून मार्ग काढत भाजपचे संकटमोचक असलेले गिरीश महाजन यांना मिठी मारत त्यांच्या कानात ‘मोठं ऑपरेशन आहे, कामाला लागा’ असे सांगितल्याचा खुलासा खुद्द महाजन यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला.
फडणवीसांनी त्या वेळी महाजनांच्या कानात काय सांगितले? याबाबत उत्सुकता होती. फडणवीसांनी मिठी मारल्यानंतर कानाजवळ येऊन, ‘मोठं ऑपरेशन आहे, कामाला लागा’, एवढं सांगितले. हे शब्द ऐकून त्या विजयोत्सवातून थेट फडणवीस यांच्या ‘सागर’ या निवासस्थानी पोहोचलो व त्यानंतरच हे ‘ऑपरेशन’ मार्गी लावले असल्याची माहिती त्यांनी दिली. शिंदेंसोबत असलेल्या आमदारांना सुरतला पाठविण्याचे नियोजन करून, हे ऑपरेशन सुरू केले.