महसूलचे दप्तर पाहणे झाले सोपे
By admin | Published: January 18, 2017 11:43 PM2017-01-18T23:43:26+5:302017-01-18T23:43:26+5:30
प्रांत तसेच अन्य कार्यालयांनी कामकाजात अधिक पारदर्शकता आणण्यासाठी दर शुक्रवारी विविध कागदपत्रे नागरिकांना पहाण्यासाठी खुली ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
जळगाव : महसूल अंतर्गत असलेली प्रांत तसेच अन्य कार्यालयांनी कामकाजात अधिक पारदर्शकता आणण्यासाठी दर शुक्रवारी विविध कागदपत्रे नागरिकांना पहाण्यासाठी खुली ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. आपल्या एका अर्जानुसार प्रशासनाने हा निर्णय घेतला असल्याचे माहिती अधिकार कार्यकर्ता दीपक गुप्ता यांनी बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
जिल्हाधिकारी रूबल अग्रवाल, निवासी उपजिल्हाधिकारी राहूल मुंडके, महसूल उपजिल्हाधिकारी अभिजीत भांडे यांनी हा निर्णय जाहीर केला असल्याचे त्यांनी सांगितले. याबाबत आपण प्रशासनाकडे एक विनंती अर्ज केला होता असे सांगून गुप्ता म्हणाले, दर शुक्रवारी दुपारी 4 ते 6 या वेळात नागरिकांना अपेक्षित कागदपत्रे कोणताही अर्ज न देता पाहता येणार आहे.
जिल्हाधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय जळगाव जामनेर या कार्यालयामध्ये या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. मात्र कागदपत्राची प्रत पाहीजे असल्यास त्यासाठी नियमानुसार माहिती अधिकाराचा अर्ज करावा लागेल. आपल्या अर्जानुसार जळगाव मनपात क्षेत्र सभा घेणे तसेच जिल्हा परिषदेत माहिती अधिकार दिन लागू करण्यात आला असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.