आला पावसाळा, तब्बेत सांभाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 04:12 AM2021-06-28T04:12:41+5:302021-06-28T04:12:41+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोनाची लाट नियंत्रणात असली तरी वातावरणातील बदलामुळे आता अन्य व्हायरल इन्फेक्शन डोकेवर काढू शकतात, ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोरोनाची लाट नियंत्रणात असली तरी वातावरणातील बदलामुळे आता अन्य व्हायरल इन्फेक्शन डोकेवर काढू शकतात, अशा स्थितीत स्वच्छता व आहारावर विशेष लक्ष दिले तर पावसाळी आजारांना आपण दूर ठेवू शकतो, असा सल्ला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या उपवैद्यकीय अधीक्षीका डॉ. संगीता गावीत यांनी दिला आहे.
पावसाळा सुरु झाला असून वातावरणात बदल झाले आहेत. त्यामुळे या बदलत्या वातावरणात आपले आरोग्य सांभाळणे महत्वाचे झाले आहे. डॉ. गावित यांनी सांगितले आहे, की बाहेरून आल्यावर हात पाय स्वच्छ धुवावे. कोमट पाण्याने अंघोळ करावी. रोज स्वच्छ व कोरडे कपडे घालावे. पायाची विशेष काळजी घ्यावी.
या पदार्थांचे सेवन राहिल योग्य
गरम सूप पिणे, पाणी उकळून पिणे, ताजे अन्न खाणे, तळलेले पदार्थ कमी खावे यासह दिवसभरात मध्यवेळेत भूक लागली तर गरम पेय, ग्रीन टी आदी पौष्टीक पेय घ्यावे. बाहेरील उघड्यावरील अन्न पदार्थ खाऊ नये. शरीरात मिठाचे प्रमाण समतोल ठेवावे.
स्वच्छतेची अशी घ्या काळजी
घराच्या परिसरात स्वच्छता ठेवावी. घरातील कचरा घंटागाडीतच टाकावा, झाडांच्या पालापाचोळाची योग्य विल्हेवाट लावावी, आजूबाजूच्या सांडपाण्याचा निचरा होत असल्याबाबत खात्री करावी, शक्यतो गर्दी टाळावी.