गाळेधारकांवर आली भाजीपाला व फळ विक्री करण्याची वेळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2021 04:14 AM2021-04-06T04:14:43+5:302021-04-06T04:14:43+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव - महापालिकेच्या मुदत संपलेल्या मार्केटमधील गाळेधारकांनी गेल्या अकरा दिवसांपासून महापालिका प्रशासनाच्या कारवाईविरोधात संप पुकारला आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव - महापालिकेच्या मुदत संपलेल्या मार्केटमधील गाळेधारकांनी गेल्या अकरा दिवसांपासून महापालिका प्रशासनाच्या कारवाईविरोधात संप पुकारला आहे. तसेच दररोज एका मार्केटमधील गाळेधारकांकडून महापालिका प्रशासनाचा निषेध म्हणून आंदोलन केली जात असून, सोमवारी धर्मशाळा मार्केटमधील गाळेधारकांनी भाजीपाला व फळ विक्री आंदोलन करून मनपा प्रशासनाचा निषेध व्यक्त केला.
या आंदोलनात धर्मशाळा मार्केटमधील प्रकाश गगनानी, रमेश तलरेजा, सुनील रोकडे, दिनेश वालेचा, जगदीश दासवाणी, अनुप अडरेजा यांच्यासह इतर गाळेधारकांनी सहभाग घेतला. महानगरपालिका तर्फे होत असलेल्या कारवाईच्या निषेध म्हणून शहरातील १६ अव्यावसायिक मार्केट मधील १५०० गाळेधारकांनी गेल्या अकरा दिवसांपासून बेमुदत बंद पुकारला आहे. धर्मशाळा मार्केटचे गाळेधारकांनी भाज्या व फळ विकून आंदोलन केले.
आत्मदहन करण्याचा इशारा
महानगरपालिका अन्यायकारक मागणी गाळेधारकांकडे करत आहे. इतकी रक्कम गाळेधारक घरदार विकून सुद्धा भरू शकत नाही. विशेषतः महापालिका नैसर्गिक न्यायतत्वावर गाळेधारकांना म्हणणे मांडण्याची योग्य संधी देत नसल्याची माहिती गाळेधारक संघटनेच्या वतीने देण्यात आली आहे. महानगरपालिकेतर्फे अशाच प्रकारे कारवाई करण्यात येत असेल तर धर्मशाळा मार्केटमधील गाळेधारकांनी आत्मदहन करण्याची परवानगी शासनाकडे मागितलेली आहे. तसेच यापुढे कुठल्याही गाळेधारकाच्या परिवारातील कोणत्याही सदस्यांचे काहीही बरेवाईट झाल्यास किंवा कोणत्याही गाळेधारकाने आत्महत्या केली किंवा त्याचा जीव गेल्यास त्याला सर्वस्वी महानगरपालिका प्रशासन जबाबदार असेल असा इशारा गाळेधारक संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.
सत्ताधारी व विरोधकांसह प्रशासनाचेही दुर्लक्ष
शहरातील १६ मार्केटमधील तब्बल १५०० हून अधिक गाळेधारकांनी गेल्या अकरा दिवसांपासून संप पुकारला आहे. तसेच दररोज प्रशासन व महापालिकेतील पदाधिकाऱ्यांचे लक्ष वेधण्यासाठी गाळेधारकांकडून दररोज आंदोलन केले जात आहे. मात्र या आंदोलनाची व संपाची दखल महापालिका प्रशासन किंवा कोणत्याही पक्षाचा पदाधिकारी घ्यायला तयार नाही. यामुळे गाळेधारकांमध्ये संतापाचे वातावरण पाहायला मिळत आहे.