जे. के. पार्क अजूनही ताब्यात नाही, नोटीस देऊन पंधरा दिवस उलटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 04:15 AM2021-01-23T04:15:49+5:302021-01-23T04:15:49+5:30
जळगाव : शहरातील मेहरुण तलावालगत असलेली मनपाच्या मालकीची जागा जे. के. डेव्हलपर्सकडून मनपाने अद्यापही ताब्यात घेतलेली नाही. मनपा प्रशासनाने ...
जळगाव : शहरातील मेहरुण तलावालगत असलेली मनपाच्या मालकीची जागा जे. के. डेव्हलपर्सकडून मनपाने अद्यापही ताब्यात घेतलेली नाही. मनपा प्रशासनाने जे. के. डेव्हलपर्सला ‘८१ ब’ची नोटीस बजावून पंधरा दिवस उलटून गेले आहेत. मात्र, अद्यापही मनपाने ही जागा ताब्यात घेतलेली नाही. गेल्यावर्षीही जानेवारी महिन्यातच मनपाने जे. के. डेव्हलपर्सला नोटीस बजावली होती. मात्र, वर्षभर कारवाईच केली नव्हती. आताही हीच परिस्थिती पाहायला मिळत आहे.
दरम्यान, शुक्रवारी उपमहापौर सुनील खडके, नगरसेविका ॲड. शुचिता हाडा यांनी याठिकाणी पाहणी केली. या पाहणी दरम्यान मनपाच्या १८१ चौरस मीटरच्या जागेवर अनेक ठिकाणी अनधिकृत बांधकाम झाले असून, मनपाकडून अद्याप या जागेवरील अतिक्रमणदेखील काढण्यात आलेले नाही. या जागेवर मनपाकडून बॉटनिकल गार्डन व बटरफ्लाय पार्क तयार करण्याचे अंदाजपत्रक बनविण्यात आले आहे. यासाठी गेल्यावर्षीच्या अंदाजपत्रकात ५ कोटींची तरतूदही करण्यात आली आहे. ॲड. शुचिता हाडा यांनी मनपा प्रशासनाला २५ कोटींच्या निधीतून शिल्लक असलेल्या १ कोटीच्या रकमेतून या जागेभोवती संरक्षक भिंत बांधण्याची मागणी केली आहे. जे. के. डेव्हलपर्सला मनपाने सात दिवसात ही जागा खाली करण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र, जे. के. डेव्हलपर्सने तीन दिवसांची मुदतवाढ मागितली होती. मात्र, मुदतवाढ दिल्यानंतर आठ दिवसांचा कालावधी उलटला तरीही मनपाकडून कारवाई झालेली नाही. याबाबत जे. के. डेव्हलपर्सची सुनावणीदेखील झाली. तरीही कारवाई थांबण्याचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.
बेसमेंटबाबतही कानाडोळा
मनपाकडून अनेक प्रकरणात केवळ नोटीस दिल्यानंतर त्या प्रकरणांकडे दुर्लक्ष करण्याची पध्दत सुरु झाली आहे. जे. के. पार्कसह बेसमेंटचा व्यावसायिक वापर करणाऱ्यांनादेखील मनपा प्रशासनाने नोटीस बजावल्या होत्या. मात्र, या नोटीस बजावून एक महिन्याचा कालावधी झाला आहे. तरीही मनपाकडून कारवाई करण्यात आलेली नाही. यासह भंगार बाजाराबाबतही मनपाचे दुर्लक्ष झाले आहे.