गूळ प्रकल्पात यंदा शून्य टक्के जलसाठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 04:17 AM2021-07-29T04:17:40+5:302021-07-29T04:17:40+5:30
संजय सोनवणे चोपडा : सातपुडा पर्वतात शेकडो किलोमीटर अंतरावरून पाणी घेऊन येणार्या गूळ नदीवरील गूळ प्रकल्पात यंदा जुलैअखेर ...
संजय सोनवणे
चोपडा : सातपुडा पर्वतात शेकडो किलोमीटर अंतरावरून पाणी घेऊन येणार्या गूळ नदीवरील गूळ प्रकल्पात यंदा जुलैअखेर शून्य टक्के जलसाठा आहे. यापुढे जर पावसाचे पाणी आले नाही तर मात्र शून्य साठा हा गंभीर चिंतेचा विषय ठरणार आहे. या प्रकल्पात सध्या डबके साचल्यागत पाणीसाठा दिसत आहे.
चोपडा तालुक्यातील मालापूर येथे गूळ नदीवर गूळ मध्यम प्रकल्पाची निर्मिती करण्यात आली आहे. या प्रकल्पाची पाणीसाठा क्षमता २३.२५ दशलक्ष घनमीटर आहे. आतापर्यंत केवळ मृत म्हणजे पाणीच नसल्यागत स्थिती धरणात आहे. यावर्षी पावसाळा अर्धा संपण्याच्या स्थितीला आहे. यापैकी गेल्या दोन वर्षांपासून चोपडा शहराला पाणीपुरवठा व्हावा म्हणून नगरपालिकेसाठी ३ दशलक्ष घनमीटर पाण्याचा साठा राखीव करण्यात आला आहे.
गेल्यावर्षी चोपडा तालुक्यात जुलै महिनाअखेर ६६८.६२ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली होती. यंदा मात्र जुलैअखेर केवळ १७४.०३ मिलिमीटर पावसाची नोंद शासकीय दप्तरी करण्यात आली आहे. त्यामुळे आतापर्यंत यंदा चोपडा तालुक्यात कमी प्रमाणात पावसाची नोंद गेल्या वर्षाच्या तुलनेत झाल्याचे निष्पन्न होते. पुढील काही दिवसांत जर पावसाने पुन्हा दडी मारली तर शासनासह तालुकावासीयांसाठी व परिसरातील शेतकऱ्यांसाठी चिंतेचा विषय ठरणार आहे.
गूळ मध्यम सिंचन प्रकल्प तालुक्यात सातपुड्याच्या पायथ्याशी मालापूर येथे गूळ नदीवर बांधण्यात आला आहे. या प्रकल्पामध्ये धरणाची जास्तीत जास्त उंची ३१.३३ मीटर आणि १७५ मी. लांबीचा दगडी बांध आणि २८.७६ मी. जास्तीत जास्त उंचीचा कॉंक्रीट धरणाचा समावेश आहे. ४२ मीटर लांबीच्या गेटमधून १८३०.३० क्यूसेक पाणी विसर्ग करण्याची क्षमता आहे. चोपडा तालुक्यातील ११ गावांमधील ३७०८ हेक्टर क्षेत्र सिंचन करण्याची क्षमता आहे. या प्रकल्पात ३.६७ किमी लांबीचा डावा कालवा (एलबीसी) आणि ४.६२ किमी लांबीचा उजवा कालवा (आरबीसी) यांचा समावेश आहे. धरणात पाणीसाठाच झाला नाही तर वरीलपैकी एकही लाभ मिळणार तर नाहीच, उलट चोपडा शहराचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न गंभीर होईल. तालुक्यात दमदार पाऊस पडण्याची गरज आहे.
फोटो