जळगावला जपलंय हृदयाचा कप्प्यात
By admin | Published: April 17, 2017 11:24 AM2017-04-17T11:24:14+5:302017-04-17T11:24:14+5:30
रथचौक.. सुभाष चौक. बळीरामपेठ..सगळसगळ आठवतंय.. अस सांगताना सिनेअभिनेता जितेंद्र जोशी गहिवरले.
सिने अभिनेता जितेंद्र जोशी : जुन्या आठवणींना दिला उजाळा; शहरातील विक्रमी तापमानाची भिती
जळगाव : लहानपणी सुटय़ांमध्ये जळगावातील पुष्पा मावशीकडे यायचो.. इथल्या रस्त्यांवर भटकायचो.. रथचौक.. सुभाष चौक. बळीरामपेठ..सगळसगळ आठवतंय.. अस सांगताना सिनेअभिनेता जितेंद्र जोशी गहिवरले. पांडे कुटुंबिय माङो नातेवाईक.. रंगकर्मी प्रविण पांडे हा माझा मित्र.. या शहराने कधीही बोलवले तर येईन..
राजकमल टॉकीज परिसर असो वा भैय्याजीच्या कुल्फीची चव, लहानपणी होती तशीच आजही आहे. दहा वर्षानंतर मी जळगावात आलो. गेल्या पंधरा-वीस वर्षात शहरात फार काही बदल झाला नसला तरी जळगावच्या उन्हाळ्यात मात्र मोठा बदल झाला आहे. यंदाच्या उन्हाची तर भिती वाटत असल्याची प्रतिक्रिया मराठी सिनेअभिनेता जितेंद्र जोशी यांनी रविवारी महावीर ज्वेलर्समध्ये आयोजित पत्रकार परिषदेत दिली. एका शाळेच्या कार्यक्रमासाठी रविवारी ते शहरात आले असता जुन्या आठवणींना उजाळा दिला.
नाती कधीही तुटत नसतात
जितेंद्र जोशी म्हणाले की, जळगावात आल्यानंतर प्रत्येक नातेवाईकाची भेट घेतली. रथ चौकात गेल्यानंतर परिसरातील मित्रांशी गप्पा मारल्या. त्यांच्या दृष्टीने जितेंद्र जोशी मोठा अभिनेता असला तरी मी त्यांना केवळ माङो नातेवाईक व मित्रच मानतो. व्यस्त वेळात संबध जोपासणे सर्वात मोठे काम असते. कारण स्टारपण आज आहे, उद्या नाही. मात्र नाती ही कधीच तुटत नाही.
सोशल नेटवर्किग साईट्सवर विचारवंत तयार
सध्या युवक सोशल साईट्सवर आपला वेळ वाया घालवितात. मात्र यामुळे घरा-घरातला संवाद हरविला आहे. तसेच अनेक सोशल साईट्सवर अनेक ‘विचारवंत’ देखील तयार झाले आहेत. यामुळे अनेकदा वाद देखील उद्भवतात. हे युवकांनी टाळले पाहिजे असे आवाहन जोशी यांनी केले.
चित्रपटासाठी दिग्दर्शकाकडे जात नाही
मराठी चित्रपटांमध्ये यश मिळाले की हिंदी चित्रपटांमध्ये काम करायचे असा समज कलाकारांमध्ये आहे. मात्र मला तसे काही वाटत नसून चित्रपटात काम करायला मिळावे म्हणून मी कोणत्याही दिग्दर्शकाकडे गेलो नसल्याचे जितेंद्र जोशी यांनी सांगितले.
भविष्यात जळगावात ‘दोन स्पेशल’ या नाटकाच्या प्रयोग करण्याची संधी मिळाली तर नक्की करेन असे आश्वासन देखील जितेंद्र जोशी यांनी दिले.
मुलांना मोकळीक द्या
जळगावात गेल्या काही वर्षापासून येण्याचे ठरविले होते. मात्र वेळच मिळत नव्हता. मुलांचा कार्यक्रम असल्याने जळगावला आलो. मुलांच्या कार्यक्रमात पालकांशी संवाद साधण्याची कोणतीही संधी हुकू देत नाही. पालकांमध्ये मीपणा निर्माण झाला आहे, आपला पाल्य एक नंबर कसा येईल हाच विचार त्यांच्या मनात आहे. मुलांना मोकळीक देण्याची गरज असून, त्यांना मनाप्रमाणे जगू द्या असे आवाहन त्यांनी केले.
दुष्काळ येण्यापूर्वीच दोन हात करण्याची तयारी ठेवा
गेल्या काही वर्षापासून पर्यावरणाचा मोठय़ा प्रमाणात :हास होत आहे. यामुळे वातावरणात देखील अनेक बदल होत आहेत. दुष्काळ येण्याची वाट न पाहता त्याआधी दुष्काळाशी दोन हात करण्याची गरज आहे. यासाठी प्रत्येक शेतक:याने, ग्रामस्थांनी जलसंधारणाचे काम केले पाहिजे. पाणी फाउंडेशन चे काम हे कोणत्याही फायदा तोटय़ासाठी नसून केवळ पाण्यासाठी असल्याचे जोशी यांनी सांगितले.