जळगाव : एकाच दिवसांत ४८ हजार आधार कार्ड गायब पण या सिस्टीममधून...
By अमित महाबळ | Published: April 23, 2023 07:31 PM2023-04-23T19:31:49+5:302023-04-23T19:32:05+5:30
गेल्या २४ तासांत जळगाव जिल्ह्यातील ४८ हजारांवर आधार व्हॅलिड करून घेण्यात शिक्षकांना यश आले आहे तरीही यापेक्षा अधिक संख्येने कार्ड इनव्हॅलिड दिसत आहेत.
जळगाव : शाळांची संच मान्यता विद्यार्थ्यांच्या आधार व्हॅलिडेशनवर मंजूर केली जाणार असून, हे काम पूर्ण करण्यासाठी आता केवळ सात दिवस बाकी राहिले आहेत. गेल्या २४ तासांत जळगाव जिल्ह्यातील ४८ हजारांवर आधार व्हॅलिड करून घेण्यात शिक्षकांना यश आले आहे तरीही यापेक्षा अधिक संख्येने कार्ड इनव्हॅलिड दिसत आहेत.
शाळांना अनुदान व टप्पा वाढ देताना शासनाने आधार आधारित संच मान्यता करून घेण्यास सांगितले आहे. त्यासाठी दि. ३० एप्रिलपर्यंत अंतिम मुदत आहे. आधार इनव्हॅलिड राहिल्यास त्या तुलनेत शिक्षकांच्या नोकऱ्या धोक्यात येणार आहेत. मुदत संपल्यांतर ही सर्व आकडेवारी स्पष्ट होईल. या कामाला मुदतवाढ मिळण्याची किंवा एका शैक्षणिक सत्रासाठी आधार व्हॅलिडेशन थांबवावे, अशी मागणी संघटनांकडून होत असली तरी त्यावर शिक्षण विभागाकडून अद्याप भाष्य करण्यात आलेले नाही. त्यामुळे धाकधूक कायम आहे.
राज्यात दि. २२ एप्रिल २०२३ अखेर ५९,१०,६३५ आधार कार्ड इनव्हॅलिड होते. त्यामध्ये जळगाव जिल्ह्यातील १,२२,५८४ कार्डचा समावेश होता. याच्या दुसऱ्या दिवशी हीच संख्या ७४,२४७ एवढी कमी झाली. जिल्ह्यातील १५ तालुके व एक महापालिका क्षेत्र मिळून १६ ब्लॉकमध्ये याआधी नोंद झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या ८,३२,६४२ आहे. या सर्वांचे आधार कार्ड व्हॅलिड करून दाखवायचे आहेत.
दोन दिवसांपूर्वी आधार व्हॅलिडेशनच्या कामात जळगाव तिसऱ्या क्रमांकावर होता. यामध्ये सुधारणा होण्याच्या हेतूने शिक्षण विभागाने गटशिक्षणाधिकारी व ऑपरेटर यांची आढावा सभा घेतली होती. बाकी असलेले १४ टक्के काम पुढील दोन दिवसांत पूर्ण होण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्याचे चांगले परिणाम दिसून आले आहेत. त्यामुळे गेल्या २४ तासांत झालेल्या व्हॅलिडेशनच्या कामानंतर आता केवळ ७४ हजार आधार व्हॅलिड करणे बाकी आहेत. पण तांत्रिक चुका, भौगोलिक स्थान निश्चित आदी विविध कारणांमुळे उर्वरित काम मागे पडू शकते, असे सांगितले जात आहे.