जळगाव जिल्ह्यात १ एप्रिलपासून शाळांची वेळ सकाळी ७ ते दुपारी १ जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2023 06:51 PM2023-03-27T18:51:58+5:302023-03-27T18:52:06+5:30
जिल्ह्यातील सर्व शासकीय व खासगी (प्राथमिक व माध्यमिक) शाळांच्या वेळेत १ एप्रिलपासून सकाळी ७ ते दुपारी १ असा बदल करण्यात आला आहे.
विजयकुमार सैतवाल
जळगाव : उष्माघात उपाययोजनांतर्गत जळगाव जिल्ह्यातील सर्व शासकीय व खासगी (प्राथमिक व माध्यमिक) शाळांची वेळ आता सकाळी सात ते दुपारी एक या वेळेत राहणार असून तसे आदेश जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी सोमवारी जारी केले.
राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण व राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांनी उष्माघात उपाययोजनासाठी स्थानिक स्तरावर करावयाच्या नियोजनाविषयी सूचना दिलेल्या आहेत. त्यात जळगाव जिल्हा उष्माघात प्रवण असल्याने व ही बाब आपत्ती या सदरात येत असल्याने या पूर्वीच विविध उपाययोजना सूचविण्यात आलेल्या आहेत. त्यात आता शाळांच्या वेळेतही बदल करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. त्यानुसार जिल्ह्यातील सर्व शासकीय व खासगी (प्राथमिक व माध्यमिक) शाळांच्या वेळेत १ एप्रिलपासून सकाळी ७ ते दुपारी १ असा बदल करण्यात आला आहे.
तसेच उष्माघाताची तीव्रता लक्षात घेवून संबंधितांनी तात्काळ कार्यवाही करावी, सदर आदेश सर्व शाळांना बंधनकारक आहे, असे जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे.