Jalgaon: पगार हाती पडण्यापूर्वीच तरुणावर काळाची झडप, रेल्वेच्या धडकेत झाला मृत्यू
By विजय.सैतवाल | Published: December 24, 2023 01:57 PM2023-12-24T13:57:45+5:302023-12-24T13:58:19+5:30
Jalgaon News: कामाचा मोबदला घेण्यासाठी जात असताना धावत्या रेल्वेची धडक लागून रवींद्र अशोक मिस्तरी (शिरसाठ) (३८, रा. हरिविठ्ठल नगर) हे जागीच ठार झाले. ही घटना रविवार, २४ डिसेंबर रोजी सकाळी आठ वाजेच्या सुमारास हरिविठ्ठल नगर परिसरातील रेल्वे रुळावर घडली.
- विजयकुमार सैतवाल
जळगाव - कामाचा मोबदला घेण्यासाठी जात असताना धावत्या रेल्वेची धडक लागून रवींद्र अशोक मिस्तरी (शिरसाठ) (३८, रा. हरिविठ्ठल नगर) हे जागीच ठार झाले. ही घटना रविवार, २४ डिसेंबर रोजी सकाळी आठ वाजेच्या सुमारास हरिविठ्ठल नगर परिसरातील रेल्वे रुळावर घडली.
रवींद्र मिस्तरी हे इमारतींना रंग देण्याचे काम करीत असत. आठवडाभर काम केल्यानंतर त्याचा मोबदला घेण्यासाठी ते हरिविठ्ठल नगरातून खंडेराव नगरकडे जात होते. त्या वेळी विश्वकर्मा मंदिरानजीक रेल्वे रुळाजवळ त्यांना धावत्या रेल्वेची धडक बसली. त्यात ते जागीच ठार झाले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर आजूबाजूचे नागरिक तेथे पोहचले व पोलिसांना माहिती दिली. पंचनामा करून मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेण्यात आला. या ठिकाणी नातेवाईक व मित्र परिवाराची गर्दी झाली होती.
आई-वडिलांचा आधार हरवला
रवींद्र हे वृद्ध आई-वडिलांसह हरिविठ्ठल नगरमध्ये राहत होते. त्यांना तीन विवाहीत बहिणी आहे. घरातील रवींद्र हेच कर्ते व्यक्ती होते. घरकाम करून आई कुटुंबाला हातभार लावत होती. मात्र आता एकुलत्या एक मुलाचे अपघाती निधन झाल्याने वृद्ध आई-वडिलांचा आधार हरवला आहे.