जळगाव एसीबीची एरंडोलमध्ये मोठी कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2023 02:34 PM2023-06-14T14:34:21+5:302023-06-14T14:35:51+5:30
दोन शिक्षकांची बदली थांबवण्यासाठी 75 हजार रुपयांची लाच घेतांना मुख्याध्यापकासह लिपिक आणि शिक्षण संस्थेचा अध्यक्ष जाळ्यात
प्रशांत भदाणे, जळगाव: जिल्ह्यातील एरंडोल येथील महात्मा फुले हायस्कूलचे मुख्याध्यापक विनोद जाधव, लिपिक नरेंद्र वाघ यांच्यासह जळगावच्या श्री.सावता माळी शिक्षण प्रसारक मंडळाचा अध्यक्ष विजय महाजन यांचा आरोपींमध्ये समावेश आहे. या प्रकरणी पाचोरा येथील रहिवासी आणि महात्मा फुले हायस्कूलच्या एका शिक्षकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती.
तक्रारदार शिक्षकासह त्याचा सहकारी शिक्षकाची एरंडोल येथून धरणगावला बदली केली होती. ही बदली थांबवण्यासाठी तिन्ही आरोपींनी तक्रारदार आणि त्याच्या सहकारी शिक्षकाकडून पूर्ण एक पगार म्हणजेच 75 हजार रुपयांची लाच मागितली होती. लाचेची रक्कम आरोपींनी मुख्याध्यापक विनोद जाधव यांच्या नावाच्या चेकच्या स्वरूपात स्वीकारली तेव्हा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांना अटक केली.
आरोपींनी एरंडोलच्या महात्मा फुले हायस्कूलमध्ये लाचेची रक्कम स्वीकारली. त्यांच्यावर एरंडोल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे