Jalgaon: पत्नीपाठोपाठ पतीचेही अडीच तासातच निधन! सहजीवनाचा प्रवास परलोकीही कायम
By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2024 07:33 PM2024-01-03T19:33:21+5:302024-01-03T19:33:40+5:30
Jalgaon News: ८१ वर्षीय पत्नीच्या निधनाचा शोकही रोखू शकले नाहीत आणि सहचारिणीची सोबत हरपली म्हणून दु:खही लपवायला विसरले नाहीत. म्हणून तर दैवालाही या आनंददायी दाम्पत्याचा विरह सहन होऊ शकला नाही. पत्नीच्या निधनानंतर अडिच तासातच पतीनेही जगाचा निरोप घेतला.
- कुंदन पाटील
जळगाव - ८१ वर्षीय पत्नीच्या निधनाचा शोकही रोखू शकले नाहीत आणि सहचारिणीची सोबत हरपली म्हणून दु:खही लपवायला विसरले नाहीत. म्हणून तर दैवालाही या आनंददायी दाम्पत्याचा विरह सहन होऊ शकला नाही. पत्नीच्या निधनानंतर अडिच तासातच पतीनेही जगाचा निरोप घेतला तेव्हा ‘पाटील’गृही ममत्व-पितृत्व हरपल्याने दु:खाचा डोंगर कोसळला.
मेहरुणमधील रामेश्वर कॉलनीत ८६ वर्षीय शालिग्राम दामू पाटील (विसपुते नेरीकर) यांचे कुटूंब वास्तव्यास. शालिग्राम पाटील यांनी मायमाती पूजण्यातच आयुष्य घालविले. शेतीशी एकनिष्ठ असणाऱ्या पाटील यांचा मुलगा किशोर तिकडे सराफी व्यवसायात पाय रोवत गेला. पाच लेकींचा विवाहानंतर संसार गुण्यागोविंदानं सुरु असतानाच या रावळासाठी ‘बुध’वार ‘घात’वार ठरला. सकाळी साडे अकरा वाजता प्रमिलाबाई शालीग्राम पाटील यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. सहचारिणी म्हणून सोबतीने आयुष्य पूजणाऱ्या आणि जगणाऱ्या शालिग्राम पाटील यांना धक्काच बसला. प्रमिलाबाईंचं एकटं जाणं त्यांच्या मनाला खुपत गेलं. मुलगा किशोर, सून, नातवंडांसह पाचही लेकी माय हरपली म्हणून दु:खात बुडाले. तिकडे शालिग्राम पाटील दु:ख पचवत बसले. ते दु:खही होतेच असह्य करणारं.सात जन्माची गाठ बांधणाऱ्या प्रमिलाबाईंविना आयुष्य एकाकी आहे, याची जाणीव होत गेली आणि दुपारी २ वाजता त्यांना ह्दयविकाराने हेरले. प्रमिलाबाईंसोबत प्रवास करण्यासाठी. त्यांचेही निधन झाले. एकानंतर दुसरी वेदनादायी घटना घरात घडली म्हणून मातृ-पितृछत्र हरपलेल्या या घराला अश्रूंनी चिंब केले. शेजारीही या दोघांच्या निधनानंतर हळहळ व्यक्त करीत गेले.
आज होणार दोघांवर अत्यंसंस्कार
नातलग जमले. लेकींसह जावईदेखिल. नातवंडे होतेच सोबतीला. दोघांवर एकाचवेळी अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार प्रमिलाबाई आणि शालिग्राम पाटील यांच्यावर गुरुवारी सकाळी १० वाजता मेहरूण स्मशानभूमीत अखेरचा निरोप द्यायचे ठरले.