जळगाव विमानतळावरून ८ एप्रिलपासून गोवा, हैद्राबाद तर १ मे पासून पुणे विमानसेवा सुरू होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2024 12:50 AM2024-03-17T00:50:19+5:302024-03-17T00:50:53+5:30
१ मे पासून पुणे येथे विमान सेवा सुरू होणार आहे.
भूषण श्रीखंडे/ जळगाव : भारत सरकारच्या नागरी उड्डाण मंत्रालयाच्या मान्यतेनुसार, उड्डाण ५.० योजने अंतर्गत जळगाव विमानतळावरून ‘फ्लॉय ९१’ विमान कंपनीला जळगाव विमानतळावरून उड्डाणे चालवण्याचा परवाना देण्यात आला आहे. ८ एप्रिल पासून गोवा, हैद्राबादला तर १ मे पासून पुणे येथे विमान सेवा सुरू होणार आहे.
केंद्र शासनाच्या उड्डाण योजनेअंतर्गत जळगाव विमानतळावरून पुण्यासह गोवा, हैद्राबाद या ठिकाणी विमानसेवा सुरू करण्यासाठी ‘फ्लॉय ९१’ या विमान कंपनीने पाठविलेल्या प्रस्तावाला भारतीय विमानतळ प्राधिकरण अर्थात डीजीसीएने ३ मार्चला परवानगी दिली होती. त्यानुसार ‘फ्लॉय ९१’ कंपनीला मिळालेल्या गोवा, हैद्राबाद तसेच पुणे विमानतळावरून मिळालेल्या स्लॉट नुसार विमानसेवा वेळापत्रक तयार केले आहे. या वेळापत्रकाला जळगाव विमानतळ विभागाकडून उड्डाण चालविण्याचे परवाना देण्यात आला आहे. तर या विमानसेवेचे वेळापत्रक अंतिम मंजूरीसाठी डीजीसीएकडे पाठवण्यात आले असल्याची माहिती विमान प्राधिकरण विभागाकडून मिळाली आहे.
असे राहणार विमानसेवेचे वेळापत्रक
८ एप्रिल ते ३० एप्रिल दरम्यान गोव्यावरून सकाळी ८.५५ वाजता जळगाव विमानतळावर विमानाचे आगमन होईल. तसेच हैद्राबादला सकाळी ९.२५ वाजता जाईल. हैद्राबादवरून दुपारी १,२५ मिनीटाला जळगाव विमानतळावर आगमन होईल. तर गोव्याला १.५५ वाजता उड्डाण करेल. तर १ मे ते २६ ऑक्टोबर दरम्यान गोव्यावरून दुपारी ४.५ मिनीटाला जळगावला विमान येईल. तर दुपारी ४.३५ वाजता हैद्राबादला रवाना होईल. हैद्राबादवरून रात्री ८.३५ विमान जळगावला येईल तर रात्री ९.५ मिनीटाला गोव्याला रवाना होईल.