जळगाव : विहीर खोदताना मिळाली होती उजव्या सोंडेची गणपतीची मूर्ती
By अमित महाबळ | Published: September 6, 2022 04:59 PM2022-09-06T16:59:04+5:302022-09-06T16:59:28+5:30
सुमारे ५७ वर्षांपूर्वी, जळगाव शहराच्या बाहेर असलेल्या एका शेतात विहिरीसाठी खोदकाम चालू असताना अचानक गणपतीची मूर्ती मिळाली
जळगाव : सुमारे ५७ वर्षांपूर्वी, जळगाव शहराच्या बाहेर असलेल्या एका शेतात विहिरीसाठी खोदकाम चालू असताना अचानक गणपतीची मूर्ती मिळाली, तीही उजव्या सोंडेची होती. शेतमालकाने मोठ्या आनंदाने त्याच जागेवर चौथरा बांधून त्यावर बाप्पाची प्रतिष्ठापना केली. कालांतराने त्यांनी शेत विकले. तेथे रहिवासी भाग तयार झाला. मात्र, मंदिर होते तसेच राहिले. बाप्पाच्या सान्निध्यातील म्हणून त्याला ‘गणपती नगर’ हे नाव मिळाले.
शिरसोली नाक्याच्या अलीकडे गणपती नगरच्या मुख्य रस्त्यावर लाल रंगातील एक छोटे मंदिर आहे. तेच हे उजव्या सोंडेचे गणपती मंदिर. जयवंत मुळे यांनी मंदिराची माहिती दिली. त्यांचे पणजोबा गणपतराव मुळे हे वनखात्यात नोकरीला होते. त्यांचे जळगाव शहराच्या बाहेर मोठे शेत होते. शेताच्या एका बाजूला एसपी बंगल्यामागील स्टेट बँक कॉलनी आणि दुसरीकडे फटाका फॅक्टरी होती. या दोन्हींच्या मधल्या जागेत आताच्या हायवेपर्यंत विस्तीर्ण शेत होते. १९६५च्या सुमारास वडील संभाजी मुळे हे विहिरीसाठी शेतात खोदकाम करत असताना त्यांना गणपतीची मूर्ती मिळाली. तीही उजव्या सोंडेची होती. ज्या जागेवर मूर्ती मिळाली तेथेच त्यांनी १९६६ मध्ये चौथरा बांधून गणेश जयंतीच्या दिवशी मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली.
गणेश जयंतीला मोठा कार्यक्रम
शेतात मूर्ती सापडली तेव्हा तिच्यावर शेंदूर लावलेला होता. नंतरही शेंदूरच लावला जात होता. काही वर्षांनी मूर्तीला रंग देण्यात आला. या ठिकाणी केलेला नवसा पूर्ण होतो, अशी भाविकांची श्रद्धा आहे. दरवर्षी गणेश जयंतीला मोठा कार्यक्रम होतो. मंदिर स्थापन झाल्यावर प्रारंभीच्या दिवसांत कुलकर्णी, त्यांच्या नंतर दत्तात्रय देशपांडे यांनी २० वर्षे सेवा केली. आता सुधीर मांडे हे व्यवस्था पाहतात. सकाळी सव्वापाच वाजता मंदिर उघडते. सायंकाळी पाच ते रात्री ८.३० वाजेपर्यंत खुले असते.