जळगाव : वाजंत्री बंद करण्यावरुन वाद पोलिसांचा लाठीमार, दगडफेक
By चुडामण.बोरसे | Published: September 4, 2022 11:16 PM2022-09-04T23:16:46+5:302022-09-04T23:17:09+5:30
धानोरा येथे विसर्जन मिरवणुकीला गालबोट
श्री विसर्जन मिरवणुकीत वाजंत्री बंद करण्यावरुन वाद झाला. यामुळे पोलिसांना लाठीमार करावा लागला. यानंतर दगडफेकही झाली. यात दोन वाहनांच्या काचा फुटल्या. सुदैवाने यात कुणालाही इजा झालेली नाही. धानोरा ता. चोपडा येथे रविवारी रात्री १०.३० वाजता हा प्रकार घडला.
मिळालेल्या माहितीनुसार, धानोरा येथे आठ गणेश मंडळे आहेत. पाचवा दिवस असल्याने तीन गणेश मंडळांच्या विसर्जन मिरवणुका लवकर पुढे सरकल्या. त्याचवेळी सपोनि किरण दांडगे हे गावात पोहचले. आता १० वाजल्याने वाजंत्री बंद करण्याचे आदेश त्यांनी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना दिेले. यावरुन पदाधिकारी व अधिकारी यांच्यात वाद झाला.
वाद वाढल्याने पोलिसांनी थेट लाठीमार सुरु केला. अचानक हा प्रकार घडल्याने मिरवणुकीसाठी आलेले लोक पळू लागले. यानंतर काही वेळात दगडफेकही सुरु झाली. यात दोन चारचाकी वाहनांच्या काचा फुटल्या. गावात रात्री उशिरापर्यंत दोन मंडळाचे श्री विसर्जन थांबविण्यात आले होते.