जळगाव : शाळा सुरू होताच पालकांना आर्थिक भूर्दंड; पल्प महागला, वह्यांच्या किंमती वाढल्या!
By अमित महाबळ | Published: April 3, 2023 04:48 PM2023-04-03T16:48:09+5:302023-04-03T16:48:28+5:30
सीबीएसईचे प्राथमिक व माध्यमिक विभागाचे तर राज्य शिक्षण मंडळाचे दहावीचे वर्ग सुरू झाले आहेत.
जळगाव : सीबीएसईचे प्राथमिक व माध्यमिक विभागाचे तर राज्य शिक्षण मंडळाचे दहावीचे वर्ग सुरू झाले आहेत. त्यामुळे पालकांची शालेय साहित्याची खरेदी सुरू झाली आहे. पण यावर्षी त्यासाठी जादा पैसे मोजावे लागणार आहेत. वह्यांच्या किंमतीत २० ते २५ टक्के वाढ झाली आहे. कच्चा माल महाग झाल्यामुळे ही दरवाढ झाली आहे.
जळगावच्या मार्केटममध्ये नामांकित कंपन्यांच्या ब्रँडेड आणि स्थानिक पातळीवर उत्पादन असलेल्या वह्या, रजिस्टर विक्रीसाठी आहेत. वह्या बनविण्यासाठी आवश्यक असलेला कागद आणि तो बनविण्याचा लागणारा पल्प महाग झाल्यामुळे वह्यांच्या किंमतीत २० ते २५ टक्क्यांची वाढ झाली आहे. त्यामुळे यावर्षी पालकांच्या खिशाला आर्थिक भुर्दंड बसणार आहे. ही तर सुरुवात आहे. अद्याप पुस्तकांचे संपूर्ण संच बाजारात उपलब्ध झालेले नाहीत. पण त्यांच्याही किंमती वाढणार असल्याचे सांगितले जात आहे.
दोन देशातून पल्पची आयात
व्यावसायिक सुबोध नेवे यांनी सांगितले, की वह्या बनविण्यासाठी लागणारा कच्चा माल महागला आहे. कागद उत्पादनासाठी इंडोनेशिया व मलेशिया येथून पल्प आयात केला जायचा पण गेल्या काही दिवसांपासून इंडोनेशियाचा पल्प येत नाही. त्यामुळे मलेशियाच्या पल्पचे दर वाढले आहेत. देशातून ए-४ आकारातील कागद मोठ्या प्रमाणात निर्यात केला जात आहेत. त्याचाही परिणाम दरांवर झाला असून, २५ ते ३० टक्क्यांपर्यंत वह्यांची दरवाढ झाली आहे. दर महिन्याला ही वाढ होतच आहे. एका वहीमागे ५ ते ७ रुपये तर रजिस्टरमागे ८ ते १० रुपये वाढले आहेत. ब्रँड व कागदाचा प्रकार यानुसार किंमती ठरतात.
यामुळेही किंमती वाढल्या
जळगाव एमआयडीसीमध्ये वह्या व रजिस्टरचे उत्पादन केले जाते. त्यासाठी बल्लारशाह, आसाम व आंध प्रदेशातून कागद आणला जातो. पण कागदच महाग झाला आहे. इतर कच्चा माल, कामगारांची मजुरी, मशिनरी, वीज बिल या सगळ्यांचे खर्च वाढले आहेत. या सर्वांचा परिणाम वह्यांच्या किंमतीवर झाला आहे. पुठ्ठ्यांचे कव्हर जवळपास बंद झाले आहेत. त्याऐवजी सॉफ्ट बॉण्ड प्रकाराला ग्राहक पसंती देतात, अशी माहिती व्यावसायिकांनी दिली.
जळगावच्या मार्केटमधील दर स्थिती
प्रकार पूर्वी आता
२०० पानांची वही - २० ते ३० - ३० ते ४०
१०० पानांची वही - १५ ते २० - २० ते २५
२०० पानांची वही (१२ नग) - ३०० ते ३६० - ३०० ते ४५०
१७६ पानांचे रजिस्टर (१२ नग) - ४८० ते ५४० - ६०० ते ७००
२०० पानांचे रजिस्टर (१२ नग) - ०० - १०८०