जळगाव-असोदा-भादली रस्त्याचे काम रखडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2019 10:49 PM2019-11-18T22:49:42+5:302019-11-18T22:50:07+5:30
जळगाव : जळगाव -असोदा-भादलीसह शेळगाव-बोरावल-टाकरखेडा मार्गे यावल हा हायब्रीड अॅन्युईटी अंतर्गत मंज़ूर रस्त्याचे काम ठेकेदाराने जाणीवपूर्वक रखडवले असून सार्वजनिक ...
जळगाव : जळगाव-असोदा-भादलीसह शेळगाव-बोरावल-टाकरखेडा मार्गे यावल हा हायब्रीड अॅन्युईटी अंतर्गत मंज़ूर रस्त्याचे काम ठेकेदाराने जाणीवपूर्वक रखडवले असून सार्वजनिक बांधकाम विभागही या ठेकेदाराला पाठीशी घालत असल्याचा आरोप नागरिकांनी केला असून या रस्त्याचे काम तातडीने सुरू करण्याची मागणी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
याबाबत असोदा व भादली ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, विधानसभा निवडणुकीपूर्वी मोठ्या उत्साहात भूमीपूजन झालेल्या या रस्त्याचे काम ठेकेदाराने जाणीवपूर्वक रखडविले आहे.
ठेकेदाराने रस्त्याच्या दोन्ही बाजूस केलेल्या खोदकामामुळे देखील काही ठिकाणी भराव, काही ठिकाणी पाणी साचलेले तर काही ठिकाणी मोकळे अशी विचित्र परिस्थिती या रस्त्यांची पहावयास मिळत आहे. अशा धोकेदायक परिस्थितीत नागरिकांना वाऱ्यावर सोडून ठेकेदाराने काम बंद केलेले आहे. त्यामुळे असोदा-भादलीसह संबंधीत गावातील ग्रामस्थ रस्त्याचे काम सुरू होण्याची वाट बघत आहेत. यासंपूर्ण परिस्थितीला जबाबदार असलेल्या ठेकेदाराला सार्वजनिक बांधकाम विभाग मात्र सोयीस्करपणे पाठीशी घालत असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. रस्त्याचे काम त्वरीत सुरू करण्यात यावे, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.निवेदनावर असोद्याचे किशोर चौधरी, संजय ढाके, राजू महाजन, शरद नारखेडे, संदिप नारखेडे, भादलीचे मिलिंद चौधरी, अरूण सपकाळे, शांताराम नारखेडे, राजू चौधरी, सुधीर पाटील आदींच्या सह्या आहेत.
उपठेकेदारांकडून काम
ठेकेदाराकडून परस्पर उपठेकेदार नियुक्त करून त्यांना पुलांचे काम सोपविले आहे. उपठेकेदार यांनी ठिकठिकाणी पुलाचे काम केले असून सदयस्थितीत एका ठिकाणी काम सुरू आहे. परंतू या पुलांवरील रस्त्यांची स्थिती अत्यंत धोकेदायक असून त्या व्यतिरिक्त पूर्ण रस्ता उखडलेला आहे. त्यामुळे नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.