जळगाव येथे तरुणाला मारहाण करुन रोख रक्कम मोबाईल लांबविला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2018 01:27 PM2018-03-25T13:27:47+5:302018-03-25T13:27:47+5:30
गुन्हा दाखल
आॅनलाइन लोकमत
जळगाव, दि. २५ - कंपनीतून कामानिमित्त बी.जे.मार्केटमध्ये आलेल्या राहूल प्रकाश वाणी (वय ३०, रा.पिंप्राळा, जळगाव) या तरुणाला शाहरुख खान शाबीर खान (वय २६, रा.शिवाजी नगर, जळगाव) याने मारहाण करुन त्याच्याजवळील पाच हजार रुपये किमतीचा मोबाईल व चार हजार रुपये रोख असा ९ हजार रुपये किमतीचा ऐवज लांबविल्याची घटना शुक्रवारी दुपारी अडीच वाजता घडली.
दरम्यान, या घटनेनंतर जिल्हा पेठ पोलीस स्टेशनचे अल्ताफ पठाण व दिलीप पाटील यांनी वर्णनावरुनच शाहरुख याला अवघ्या चार तासात जेरबंद केले. त्याला शनिवारी तपासाधिकारी दिलीप पाटील यांनी न्या.डी.बी.साठे यांच्या न्यायालयात हजर केले असता २८ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. राहूल हा एमआयडीसीत एका कंपनीत कामाला आहे. शुक्रवारी तो बी.जे.मार्केटमध्ये कामानिमित्त आला होता. काम आटोपल्यानंतर कंपनीत जाण्यासाठी निघाला असता मार्केटच्या पायऱ्यावरच एका तरुणाने त्याला अडवून मारहाण करायला सुरुवात केली. जबरदस्तीने हातातील पाच हजार रुपयाचा मोबाईल व मागच्या खिशात असलेले चार हजार रुपये काढून घेतले. या नंतर तो घटनास्थळावरुन पळून गेला. त्याचा पाठलाग केला, मात्र उपयोग झाला नाही. हा प्रकार समजल्यानंतर राहूल याचे नातेवाईक निलेश जगन्नाथ वाणी व सचिन प्रदीप भावसार यांनी बी.जे.मार्केट येथे धाव घेतली. तेथून सर्व जण जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला आले. दिलीप पाटील व अल्ताफ पठाण यांनी शाहरुख याला ओळखले व चार तासातच त्याला पकडण्यात आले. त्याच्याविरुध्द जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.