जळगाव : शिरसोलीत साकारतेय खगोलशास्त्र वेधशाळा, देशातील दुसरा खासगी प्रकल्प

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2017 08:54 AM2017-11-16T08:54:32+5:302017-11-16T08:56:52+5:30

बालपणी प्रत्येकाला चंद्र आणि ता-यांचे कुतूहल वाटते. रात्रीच्या चमचमणा-या आकाशाचे मनोहारी रुप तर सर्वांनाच मोहून टाकणारे असते.

Jalgaon: Astronomy Observatory in Shirsoli, the second private project in the country | जळगाव : शिरसोलीत साकारतेय खगोलशास्त्र वेधशाळा, देशातील दुसरा खासगी प्रकल्प

जळगाव : शिरसोलीत साकारतेय खगोलशास्त्र वेधशाळा, देशातील दुसरा खासगी प्रकल्प

googlenewsNext

हितेंद्र काळुंखे/जळगाव- बालपणी प्रत्येकाला चंद्र आणि ता-यांचे कुतूहल वाटते. रात्रीच्या चमचमणाºया आकाशाचे मनोहारी रुप तर सर्वांनाच मोहून टाकणारे असते. आकाशातील अनेक ग्रह आणि तारे यांचे जवळून दर्शन घेण्याचा मोहही मनाला शिवून जातो मात्र यासाठी लागणा-या दुर्बीण महागड्या असल्याने दुरुनच समाधान मानावे लागते. आता ही अडचण मात्र दूर होणार असून जिल्हा आणि परिसरातील खगोलशास्त्र प्रेमींना जवळून ‘आकाश दर्शना’चा आनंद लुटता येणार आहे. यासाठी जळगाव शहरापासून जवळच शिरसोली येथे परिपूर्ण अशी खगोलशास्त्र वेधशाळा खगोल अभ्यासक सतीश पाटील यांच्याकडून साकारली जात आहे.

शहरातील खगोलशास्त्राचे अभ्यासक आणि शिरसोली येथील बारी समाज विद्यालयातील मुख्याध्यापक सतीश पंढरीनाथ पाटील यांनी आवड म्हणून आपल्या आयुष्याची कमाई या ठिकाणी लावून हा प्रकल्प जिद्दीने उभा करण्याचे काम पूर्णत्वाकडे आणले आहे. गेल्या ३० वर्षांपाूसन ते आपल्या जळगावातील घराच्या गच्चीवरुन आकाश दर्शन करायचे मात्र अलिकडच्या काळात वाढलेले प्रदूषण आणि दिव्यांचा वाढत जाणारा झगमगाट यामुळे आकाश व ग्रहताºयांचे चांगले निरीक्षण करता येत नव्हते. म्हणूनच शहरापासून दूर १२ किमी अंतरावर शिरसोली येथील शेतात ही वेधशाळा उभारली आहे. खगोलशास्त्र अभ्यासक तसेच विद्यार्थी यांच्यासाठी हा प्रकल्प अत्यंत मोलाचा असा ठरणार आहे.

देशातील दुसरी खासगी वेधशाळा
देशात कोलकाता येथे एकमेव खाजगी वेधशाळा असून त्यानंतर शिरसोलीची दुसरी वेधशाळा राहील, महाराष्ट्रातर अशी खाजगी वेधशाळा पहिलीच असल्याचा दावा सतीश पाटील यांनी केला आहे. राज्यात पुणे येथे सरकारी खगोलशास्त्र वेधशाळा असून तेथे किमान प्राथमिक तरी अभ्यास असणा-यांनाच प्रवेश मिळतो मात्र तरीही तेथे नेहमी जाणे परवडणारेही नाही. यामुळे येथील वेधशाळा ही परिसरात खूपच उपयोगी ठरणार आहे.

शाळांसाठी अभ्यास सहल
या ठिकाणी अभ्यासकांसह शाळांसाठी अभ्यास सहल काढता येणार आहे. मुलांना आकाश दर्शनासह, स्लाईड शो, ग्रहताºयांची महिती देऊन संशोधनाची आवड निर्माण करण्याचे काम केले जाणार आहे. रात्रीच्यावेळीच आकाश दर्शन करता येत असल्याने या ठिकाणी येणाºयांच्या मुक्कामाचीही व्यवस्था राहणार आहे.

सरकत्या छताची वेधशाळा
ही भूमीगत वेधशाळा असते. मोठ्या हौदाप्रमाणे या खोलीवर सरकवता येणारे छत असते. भूमीगत असल्याने तापमान नियंत्रित असते. बाहेरील प्रकाशाचाही फारसा परिणाम होत नाही. छत सरकवले की, दुर्बिणीने आकाशदर्शन करता येते.

गोल घुमटाची वेधशाळा
३५ फूट व्यास असलेले ओट्यासारखे गोल बांधकाम करुन गोल छत उभारले जाऊन प्रोजेक्टरने या ठिकणी आकाश आणि कृत्रिम नक्षत्रालय दाखवता येणार आहे. तसेच पत्र्याचा एखादा भाग सरकवून दुर्बिणीद्वारे आकाश निरीक्षणही करता येणार आहे. ही गोल घुमटाची खाजगी वेधशाळा देशातील पहिलीच असल्याचेही सतीश पाटील यांनी सांगितले.

एकूण ८ दुर्बीण
सतीश पाटील यांच्याकडे उच्च क्षमतेच्या विविध आठ दुर्बीण असून सर्व दुर्बिणींची किंमत दहा लाखांच्या आसपास आहे. यात द्विनेत्री एक दुर्बीण असून २५ पट अधिक इमेज पाहता येते. सर्वच दुर्बिणींचा वेगवेगळ्या गोष्टी पाहण्यासाठी उपयोग होतो. ग्रह, धूमकेतू, आकाशगंगा यांचे निरीक्षण करता येते.
 
आजपर्यंत अनेक स्लाईड शो, व्याख्यान आकाशदर्शनाचे कार्यक्रम घेतले असून संशोधनाचे काम सातत्याने सुरु आहे. आज पर्यंत एकाही भारतीयाने ग्रह, तारा किंवा धूमकेतूचा शोध लावलेला नाही. ही कमतरता पूर्ण करायची असून काहीतरी शोधून देशाचे नाव जागतिक पातळीवर नेण्यासाठी अखंड प्रयत्न सुरु आहेत.
- सतीश पाटील, खगोलशास्त्र अभ्यासक

शिरसोली येथे साकारत असलेली सरकत्या छताची खगोलशास्त्र वेधशाळा व शेजारी गोलाकार वेधशाळा.


 

Web Title: Jalgaon: Astronomy Observatory in Shirsoli, the second private project in the country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.