जळगाव-औरंगाबाद महामार्ग ठरतोय प्रवाशांसाठी जीवघेणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2019 12:17 PM2019-06-06T12:17:44+5:302019-06-06T12:18:40+5:30

संपूर्ण रस्ता खोदल्याचा आरोप फेटाळला

Jalgaon-Aurangabad highway leads to life fatal | जळगाव-औरंगाबाद महामार्ग ठरतोय प्रवाशांसाठी जीवघेणा

जळगाव-औरंगाबाद महामार्ग ठरतोय प्रवाशांसाठी जीवघेणा

Next

जळगाव : चौपदरीकरणाचे काम सुरू झाल्यानंतर सर्वप्रथम महामार्गाच्या दोन्ही बाजू मक्तेदाराने खोदून टाकल्याने हा जळगाव-औरंगाबाद महामार्ग प्रवाशांसाठी जीवघेणा ठरत आहे. विशेष म्हणजे काम पूर्ण करण्यासाठी दिलेल्या २ वर्षांच्या मुदतीपैकी सुमारे सव्वा वर्षांचा कालावधी संपत आला असतानाही जेमतेम २०-२५ किमी रस्त्याचे एकाच बाजूचे काँक्रीटीकरण पूर्ण झाले आहे. मात्र तरीही या कामावर देखरेख असलेल्या औरंगाबाद सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे एका बाजूचे जळगाव-औरंगाबाद रस्त्याचे काँक्रीटीकरण जुलै अखेरपर्यंत पूर्ण करण्यात येईल, असा दावा करण्यात येत आहे. तसेच मक्तेदाराने संपूर्ण १४० किमी लांबीचा रस्ता खोदून टाकल्याचा आरोप फेटाळून लावत केवळ ३०-३२ किमी लांबीचाच रस्ता खोदला असल्याचा दावा करीत मक्तेदाराला पाठीशी घालण्याचा प्रयत्नही चालविला आहे.
जुलैपर्यंत एक बाजू पूर्ण करणार...
मुंबई येथे विधानसभा विधानसभेचे अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांच्या अध्यक्षतेखाली व गिरीश महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत या १४७ किमी लांबीच्या रस्त्याची एक बाजू जुलैपर्यंत काँक्रीटीकरण करून देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र जून महिना उजाडला तरीही या १४० किमी लांबीच्या महामार्गाच्या एका बाजूचे केवळ २०-२५ किमी लांबीचेच काँक्रीटीकरण पूर्ण झाले आहे. तरीही सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी मात्र जुलैअखेर एक बाजू पूर्ण करण्यात येईल, असा दावा करीत आहेत.
तीन टप्प्यात मक्ता
औरंगाबाद- सिल्लोड-जळगाव हा रस्ता राष्टÑीय महामार्ग म्हणून (एनएच ७५३एफ) घोषित झाला आहे. त्यात औरंगाबाद ते सिल्लोड व सिल्लोड ते जळगाव जिल्ह्याच्याहद्दीपर्यंत असे दोन टप्पे व जळगाव जिल्ह्याच्या हद्दीपासून ते अजिंठा चौफुली (१०० ते १४६ कि.मी.) हा तिसरा टप्पा, असे तीन टप्पे करून मक्ता देण्यात आला आहे.
संपूर्ण रस्ता खोदल्याचा आरोप फेटाळला
मक्तेदाराने संपूर्ण जळगाव-औरंगाबाद रस्ता खोदल्याचा आरोप औरंगाबाद सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता एल.एस. जोशी यांनी ‘लोकमत’शी बोलताना फेटाळून लावला. मक्तेदाराने केवळ ३०-३५ किमी लांबीचा रस्ताच खोदला होता. त्यातही एका बाजूचे काँक्रीटीकरण जवळपास पूर्ण होत आले आहे. दररोज ५०० ते ७०० मीटरचा पॅच करण्यात येत आहे. तो वाहतुकीस तयार होताच त्यावरून वाहतुक वळवली जात आहे. त्यामुळे लोकांचा त्रास लवकरच थांबेल. तसेच मक्तेदाराचे खोदकामही थांबविण्यात आले असल्याचेही सांगितले. जळगाव हद्दीतील कामाला मात्र पाण्यामुळे अडचण येत असल्याचे सांगितले. मध्यंतरी निधीची अडचण होती. मात्र ती अडचण दूर झाल्याने जुलै अखेरपर्यंत एक बाजू पूर्ण करण्यात येईल, असे सांगितले.
कारवाईऐवजी मक्तेदाराची मनधरणी...
मक्तेदाराने या महामार्गाचे काम हाती घेतल्यावर निधीची जरी अडचण असली तरी उपलब्ध निधीतून कामाचे नियोजन करूनच ते सुरू करणे आवश्यक असताना तसेच प्रवाशांचा, वाहतुकीचाही विचार करणे आवश्यक असताना तसे न करता सरसकट संपूर्ण रस्ताच जेसीबीने खोदून टाकला. त्यामुळे पूर्वी जळगाव ते औरंगाबाद प्रवासासाठी लागणारा साडेतीन तासांचा कालावधी वाढून तब्बल ६ तासांवर पोहोचला आहे. धुळीच्या रस्त्यांवरून धक्के खात प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे प्रवासी त्रस्त झाले आहेत. मात्र निवडणुकांमध्ये व्यस्त असलेल्या राजकारण्यांना या प्रश्नाकडे लक्ष देण्यास वेळ नाही. तर अधिकारी मात्र मक्तेदाराने एकाचवेळी दोन्ही बाजूचा सगळा रस्ता का खोदला? याचा जाब न विचारता तसेच या मक्तेदारावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई न करता मक्तेदार काम सोडून निघून जाईल, या भितीने मक्तेदाराचीच मनधरणी करीत असल्याचे चित्र आहे.
दोषींवर गुन्हा दाखल करण्यासाठी चाचपणी
कोणताच अनुभवी मक्तेदार दोन्ही बाजूंचा रस्ता एकाचवेळी खोदत नाही. त्यामुळे या मक्तेदाराने कोणावर तरी सूड उगवण्यासाठीच हा खोदकामाचा उद्योग केल्याचा आरोप जाणकारांकडून होत आहे. याप्रकरणी कुठल्या कायद्यानुसार दोषींवर गुन्हा दाखल करता येईल? याचीही चाचपणी सुरू झाली असल्याची माहिती एका वरिष्ठ प्रशासकीय अधिकाºयाने ‘लोकमत’शी बोलताना दिली.

Web Title: Jalgaon-Aurangabad highway leads to life fatal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव