सत्ताधाऱ्यांच्या अक्षम्य दुर्लक्षामुळेच उद्भवली जळगाव-औरंगाबाद रस्त्याची बिकट समस्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2019 12:40 PM2019-11-04T12:40:45+5:302019-11-04T12:41:45+5:30
जळगाव : गल्लीपासून दिल्लीपर्यंतची सत्ता भाजपच्या ताब्यात असतानाही तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्यासह भाजपच्या दिग्गज नेत्यांच्या मतदारसंघातूनच जाणाºया ...
जळगाव : गल्लीपासून दिल्लीपर्यंतची सत्ता भाजपच्या ताब्यात असतानाही तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्यासह भाजपच्या दिग्गज नेत्यांच्या मतदारसंघातूनच जाणाºया जळगाव-औरंगाबाद महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी मक्तेदाराने एकाच वेळी १४९ किमीचा रस्ता दोन्ही बाजूंनी खणून ठेवला आहे. काँक्रीटीकरणाचे काम मात्र दीड-दोन वर्षांपासून रखडवल्याने गंभीर समस्या निर्माण झाली आहे. जळगावचा औरंगाबादशी या मार्गाने असलेला संपर्क तुटल्यात जमा आहे.
पावसाळा सुरू होण्यापूर्वी धूळ उडवित वाहने या खराब रस्त्यावरूनच ये-जा करीत होती. साडेतीन तासांच्या प्रवासासाठी तब्बल ६ तास लागत होते. मात्र पर्याय नसल्याने नागरिकांना हा त्रास सहन करावाच लागत होता. कारण जळगावहून औरंगाबादला अनेक रूग्ण घाटी रूग्णालयात अथवा अन्य रूग्णालयात उपचारासाठी नेले जातात. तर जळगाव सोयगावपासून अनेक रूग्ण जळगाव शहरात उपचारासाठी येतात. दिल्ली अथवा अन्य ठिकाणी विमानाने जाणाºया प्रवाशांना औरंगाबादला जाऊन तेथून फ्लाईट मिळत होती. मात्र त्या प्रवाशांना आता मुंबईला जाण्याची वेळ आली आहे. जळगावहून पुण्याला जाणारा रस्ता हा औरंगाबादमार्गेच जातो. पुण्याला जळगावहून दररोज किमान ५० खाजगी लक्झरी बसेस जात असतात. मात्र त्यांनाही या रस्त्याने जाणे अशक्य झाल्याने धुळे-मनमाडमार्गे पुण्याला जाण्याचा लांबचा फेरा पडत आहे. तर आता आता ४० किमीचा फेरा मारून चाळीसगावमार्गे औरंगाबादला जाण्याची वेळ ओढावली आहे. एस.टी.बसेसनेही याच रस्त्याचा वापर सुरू केला आहे. त्यातच पावसाळा सुरू झाला. यंदा पावसाने जोरदार हजेरी लावल्याने या खोदून ठेवलेल्या राष्टÑीय महामार्गाचे अक्षरश: तळे होऊन गेले. तरीही याच रस्त्याने वाहनांची ये-जा सुरू होती. चिखलात, पाण्यात वाहने रूतून कोंडी होत असल्याचे फोटो व्हायरल होत होते, मात्र तरीही त्याकडे सत्ताधाऱ्यांचे सोयीस्कर दुर्लक्ष झाले.
आमदार-खासदारांनी काय केले?
जळगाव-औरंगाबाद रस्ता जळगावचे पालकमंत्री, राज्याचे जलसंपदामंत्री तथा मुख्यमंत्र्यांचे संकटमोचक गिरीश महाजन यांच्या जामनेर मतदारसंघातूनच जातो. त्याखेरीज औरंगाबाद जिल्ह्यात विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या मतदारसंघातूनच हा महामार्ग जातो. खूपच ओरड झाल्यावर विधानसभा अध्यक्ष बागडे यांनी याबाबत मुंबईत सुमारे वर्षभरापूर्वी बैठक बोलविली होती. जलसंपदामंत्री महाजन हे देखील त्यावेळी उपस्थित होते. रस्त्याचे काम पूर्ण होईपर्यंत निम्म्या रस्त्याची किंवा कच्च्या रस्त्याची डागडुजी करण्याचे आदेशही दिले होते. मात्र त्या बैठकीत दिलेल्या सूचनांची अंमलबजावणी देखील झाली नाही. मात्र या नेत्यांकडून या गंभीर विषयाचा पाठपुरावा झाला नाही. तसेच या परिसरातील खासदारांनीही दिल्लीत या विषयाचा पाठपुरावा करणे अपेक्षित होते. मात्र तसे न झाल्याने आजची परिस्थिती उद्भवली आहे.
अधिका-यांवर कारवाई का नाही?
४मक्तेदाराने जळगाव-औरंगाबाद हा १४९ किमी लांबीचा रस्ता काँक्रीटीकरणासाठी एकाच वेळी दोन्ही बाजूंनी खोदून टाकला. मात्र हे होत असताना या कामावर देखरेखीची जबाबदारी असलेले अधिकारी काय करत होते? त्यांनी या कामाचे नियोजन कसे आहे? लोकांची गैरसोय होणार नाही ना? याची माहिती घेतली नाही का? संबंधीत अधिकाºयांवर कारवाई का झाली नाही? असा सवाल उपस्थित होत आहे.
दीड वर्षापासून रखडलेले काम कसे होणार
अजिंठ्याला जगभरातून येणाºया पर्यटकांना या खराब रस्त्यामुळे किंबहुना रस्ताच उरलेला नसल्याने आपला बेत रद्द करण्याची वेळ आली. जगभरात जळगाव-औरंगाबादची व पर्यायाने देशाची बदनामी झाल्यानंतर आता केंद्रीय रस्ते व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी आठ दिवसांत या १४० किमी रस्त्याची तातडीने दुरूस्ती करण्याचे अवास्तव आदेश दिले आहेत. मात्र जे काम दीड वर्षांपासून रखडले आहे. त्याची दुरूस्ती किमान वाहने जातील अशी करणे देखील काही महिन्यांचे काम आहे. ते करण्यासाठी आठ दिवसांची दिलेली मुदत ही अवास्तव असून केवळ वेळ मारून नेण्यासाठीच अशी आश्वासने व इशारे दिले जात आहेत का? असा सवाल संतप्त प्रवाशांकडून उपस्थित केला जात आहे.
गडकरी यांचे ते आश्वासन
मार्च २०१४ मध्ये जळगावात नितीन गडकरी यांची सभा झाली होती.यात त्यांनी जळगाव - धुळे चौपदरीकरणाचे कामाचे भूमिपूजन केले होते. त्यावेळी पुढील म्हणजे मार्च २०१५ मध्ये जळगाव- धुळे महामार्ग चौपदरीकरणाचे काम झालेले असेल, हे लागल्यास आपल्याकडून लिहून घ्यावे, असे भाषणात सांगितले होते. त्यामुळे आता जळगाव- औरंगाबाद मार्गाचे आठ दिवसात किती काम होईल, हे गडकरीच सांगू शकतात....