जळगाव बनले राज्यासाठी टी हब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2020 04:42 AM2020-12-17T04:42:31+5:302020-12-17T04:42:31+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शहरापासून हजारो किलोमीटरच्या अंतरात कुठेही चहा पिकत नसला तरी चहा पॅकिंग करून विक्री करणारे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शहरापासून हजारो किलोमीटरच्या अंतरात कुठेही चहा पिकत नसला तरी चहा पॅकिंग करून विक्री करणारे प्रमुख ब्रॅण्ड मात्र जळगाव शहरातच सुरू झाले आणि मोठे झाले आहेत. त्यासोबतच जळगाव शहरात आता वेगवेगळ्या फ्लेवरचे चहा विक्री करून त्याचीही इंडस्ट्री मोठ्या प्रमाणात वाढत आहे. तीन प्रमुख चहा कंपन्यांसह ५० पेक्षा जास्त कंपन्या आहेत. त्यातून चहाची विक्री जवळपास ५ ते ६ हजार क्विंटलपेक्षा जास्त होते.
तयार चहा विक्रीसोबतच जळगाव शहरात चहा पावडर पॅकिंग करून विकण्याचा व्यवसायही मोठा आहे. जळगावातील बहुतांश व्यावसायिक आसाम, पश्चिम बंगालच्या दार्जिलिंग, सिक्कीम यासह पूर्वोत्तर राज्यातून चहा मागवतात. कोलकाता टी बोर्डाच्या माध्यमातून देशात सर्वात जास्त चहाची विक्री केली जाते. त्यासोबतच सिलिगुडी आणि गुवाहाटी टी बोर्ड येथूनही मोठ्या प्रमाणात चहाची खरेदी केली जाते. त्यासाठी लिलाव होतात. त्यात महाराष्ट्रात सर्वात जास्त चहाची खरेदी मुंबईपाठोपाठ जळगाव जिल्ह्यातील व्यापाऱ्यांकडून केली जाते. जळगावमध्ये तीन प्रमुख कंपन्या पॅकेटमध्ये चहा विक्री करतात. त्यासोबतच याच कंपन्या इतर चहा विक्रेत्यांना सुटा चहादेखील पुरवतात. त्यात नाशिक, औरंगाबाद, जालना या शहरातील चहा पावडर विक्रेते चहा घेऊन जातात आणि तेथे त्याची विक्री होते.
वाफाळलेल्या चहाच्या प्रेमात जळगावकर
जळगाव शहरात २००१ मध्ये गांधी मार्केटच्या परिसरात असगर नागोरी यांनी छोटे चहाचे दुकान सुुरू केले. या सुरुवातीनंतर आता जळगाव शहरातच हा व्यवसाय चार आउटलेटपर्यंत गेला आहे. त्यांचा आधी दूध विक्रीचा व्यवसाय होता. आता एका डेअरीसह विविध दुग्धपदार्थ विक्री आणि चहा तयार करून विक्री करण्यात त्यांनी नाव कमावले. त्याचे काम आता असगर नागोरी आणि त्यांचा मुलगा जमीर नागोरी हे दोन्ही काम पाहतात.
कोट
आम्ही गेल्या काही वर्षांपासून चहाची विक्री करत आहोत. त्यात गुळाचा चहा, दुधाचे अन्य पदार्थदेखील जळगावकरांना पसंती मिळत आहे. एका छोट्या दुकानापासून सुरू झालेला हा प्रवास चार रिटेल आउटलेटपर्यंत पसरला आहे. - असगर नागोरी, चहा विक्रेते.