जळगाव-भादली रेल्वे मार्ग एप्रिलपासून सेवेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2021 04:10 AM2021-02-22T04:10:36+5:302021-02-22T04:10:36+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : भुसावळ रेल्वे प्रशासनातर्फे शनिवारी घेण्यात आलेली यशस्वी झाली असून, एप्रिल पासून हा मार्ग दळणवळणासाठी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : भुसावळ रेल्वे प्रशासनातर्फे शनिवारी घेण्यात आलेली यशस्वी झाली असून, एप्रिल पासून हा मार्ग दळणवळणासाठी वापरला जाणार आहे. मात्र, तत्पूर्वी अंतिम सुरक्षाचाचणी मार्चमध्ये घेण्यात येणार आहे.
गेल्या वर्षी जळगाव ते भादली दरम्यान रेल्वे मार्गाचे काम पूर्ण झाले आहे. या मार्गावरून नियमित रेल्वे धावण्यासाठी दोन दिवसांची चाचणी घेण्यात आली. यामध्ये पहिल्या दिवशी या मार्गावरून ताशी ११० किलोमीटरने इंजिन चालवून, चाचणी घेण्यात आली. टप्प्या-टप्प्याने इंजिनाचा वेग कमी-जास्त करुन तांत्रिक बाबी तपासण्यात आल्या. या चाचणीसाठी रेल्वेचे मुख्य अभियंता सुधीर पटेल, उपमुख्य अभियंता पंकज ढावरे, कार्यकारी अभियंता राहुल अग्रवाल, तांत्रिक अभियंता ब्रजेश कुमार आदी कर्मचारी उपस्थित होते. दरम्यान, यापूर्वी रेल्वे प्रशासनातर्फे भुसावळ ते भादली या तिसऱ्या रेल्वे मार्गाचे काम पूर्ण झाले असून, त्याची अंतिम चाचणींही यशस्वी झाली आहे. हे दोन्ही मार्ग १ एप्रिल पासून सुरू करण्याचे नियोजन रेल्वे प्रशासनाने केले आहे.
इन्फो :
रविवारी केले तांत्रिक दुरूस्ती काम
रेल्वे प्रशासनातर्फे शनिवारी इंजिन चालवून चाचणी घेण्यात आल्यानंतर, या चाचणीवेळी रेल्वे रूळांमध्ये आढळलेले तांत्रिक दोष रविवारी दुर करण्यात आले. यावेळी काही ठिकाणचे रुळही बदलविण्यात आले. तसेच या ठिकाणी सुरू असलेल्या सिंग्रल यंत्रणा व विद्युत यंत्रणेच्या कामाचींही पाहणी करण्यात आली. दरम्यान, हे सर्व तांत्रिक काम आठवडाभरात पूर्ण केल्यानंतर, १५ मार्चपूर्वी रेल्वे सुरक्षा कमिटीच्या मार्फत अंतिम सुरक्षा चाचणी घेण्यात येणार आहे. या चाचणीला डीआरएम यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती भुसावळ रेल्वे प्रशासनातर्फे देण्यात आली.