जळगावात भाजपाने उमेदवारीबाबत गाफील ठेवले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2018 02:09 PM2018-07-23T14:09:57+5:302018-07-23T14:11:16+5:30
आयात उमेदवारांमुळे भाजपात मोठ्या प्रमाणावर नाराजी असून नगरसेविका जयश्री नितीन पाटील व भाजयुमोचे सदस्य संग्रामसिंग सुरेशसिंग सूर्यवंशी यांनी बंडखोरी केली आहे. जयश्री पाटील यांनी मतदारांना आवाहन केलेल्या जाहीर पत्रकात म्हटले आहे की, पक्षाने आपल्याला झुलवत आणि गाफील ठेवले. यामुळेच आपण अपक्ष उमेदवारी कायम ठेवली असून शिवेसनेचे पुरस्कृत म्हणून मान्य केले आहे.
जळगाव : आयात उमेदवारांमुळे भाजपात मोठ्या प्रमाणावर नाराजी असून नगरसेविका जयश्री नितीन पाटील व भाजयुमोचे सदस्य संग्रामसिंग सुरेशसिंग सूर्यवंशी यांनी बंडखोरी केली आहे. जयश्री पाटील यांनी मतदारांना आवाहन केलेल्या जाहीर पत्रकात म्हटले आहे की, पक्षाने आपल्याला झुलवत आणि गाफील ठेवले. यामुळेच आपण अपक्ष उमेदवारी कायम ठेवली असून शिवेसनेचे पुरस्कृत म्हणून मान्य केले आहे.
भाजपाच्या वाईट दिवसातही उमेदवारी केली
मतदारांना वितरीत केलेल्या पत्रकात जयश्री पाटील यांनी नमूद केले आहे की, त्यांचे पती नितीन पाटील हे १९९५ पासून भाजपाशी एकनिष्ठ आहे. १९९६ ला भाजपाकडून लढण्यास कोणीही तयार नसताना नितीन पाटील यांनी उमेदवारी केली. २००१ ला केवळ ४७ मतांनी पराभूत झाले. २००३ ला निवडून आले. यानंतर जयश्री पाटील या सलग दोनदा भाजपाकडून निवडून आल्या.
ज्यांना विरोध केला त्यांनाच भाजपाने जवळ केले - सूर्यवंशी
भाजपाने कालपर्यंत ज्या शक्तींना विरोध केला आज त्याच विचाराच्या व्यक्तींना संधी देवून स्वकीयांना डावलले आहे. याविरोधातच अपक्ष म्हणून पक्षाविरोधात पाऊल उचलत प्रभाग १४ ड मध्ये बंडखोरी केल्याचे संग्रामसिंह सुरेशसिंह सूर्यवंशी यांनी सांगितले.
संग्रामसिंह हे स्वत: भाजयुमोचे सदस्य असून त्यांचे वडील डॉ. सुरेशसिंह सूर्यवंशी हे भाजपाच्या राष्ट्रीय परिषदेचे सदस्य व पक्षाचे निष्ठावंत आहेत. स्वत: सुरेशसिंह सूर्यवंशी यांचीही एकदा विधानपरिषदेची उमेदवारी पक्षाने ऐनवेळी कापली होती आणि आता डॉ.सूर्यवंशी यांच्या पत्नी मोहिनी सूर्यवंशी यांना उमेदवारी देण्याचे निश्चित असताना आयात केलेल्या उमेदवारांमुळे त्यांना उमेदवारी न देता संग्रामसिंह यांना उमेदवारी देण्याचे आश्वासन पक्षाने दिले आणि शेवटपर्यंत झुलवत ठेवले. ज्या ठिकाणाहून त्यांना उमेदवारी देण्यात येणार होती त्या ठिकाणीही आयात उमेदवार दिला. दुसऱ्या ठिकाणी अर्ज दाखल करण्यास सांगून ऐनवेळी तेथेही उमेदवारी दिली नाही, असे संग्रामसिंह यांचे म्हणणे आहे.
दरम्यान भाजपाने ज्या शक्तींचा विरोध केला त्या विरुद्ध आपल्या वडिलांनी नेहमीच लढा दिला आहे, आणि आज त्याच शक्तींशी पक्षाने सोबत केल्याने आपण स्वतंत्रपणे लढा देण्याचा निर्णय घेतल्याचेही त्यांचे म्हणणे आहे.
दरम्यान प्रभाग १४ ड मध्ये भाजपाने राजेंद्र पाटील यांना तर ब मध्ये सुरेखा सुदाम सोनवणे यांना उमेदवारी दिली आहे.
मॅनेजमेंट गुरुंसह चौघांनी अर्ज भरायला सांगितला अन्....
संघटनमंत्री, महानगराध्यक्ष, विधानपरिषदेचे आमदार व पक्षाचे मॅनेजमेंट गुरु यांनी ७ क आणि ड मध्ये अर्ज दाखल करायला सांगितले व नंतर १० रोजी रात्री ७ अ मधून अर्ज भरण्याची सूचना फोनवरुन केली. परंतु नितीन पाटील यांनी सांगितले की आम्हाला महापौर व्हायचे नाही व ओबीसी जात पडताळणीही नाही. यावर पक्षाने सांगितले की, आम्ही तुमच्यासाठी मामींचे तिकिट कापत आहे, तुम्ही ७ अ व ब मध्ये अर्ज भरा. परंतु आमच्यासाठी ज्यांचे तिकिट कापल्याचे सांगितले, त्यांनी आधीच जावून अर्ज भरला, असे आम्हाला गाफील ठेवले व नंतर आमचा फोनही पदाधिकाºयांनी घेतला नाही. यानंतर जयश्री पाटील यांनी ७ ड मधून उमेदवारी केली आहे. यावर आम्ही काय गुन्हा केला? असा सवाल जयश्री पाटील यांनी केला आहे. या ठिकाणी भाजपाने सचिन भिमराव पाटील यांना उमेदवारी दिली आहे.