थकबाकीदार गणेश मंडळांवर जळगावात बहिष्कार, लाईटींग डेकोरेटर्स असोसिएशनचा निर्णय
By अमित महाबळ | Published: August 24, 2023 04:10 PM2023-08-24T16:10:31+5:302023-08-24T16:11:43+5:30
जळगाव लाईटींग डेकोरेटर्स असोसिएशनची वार्षिक सभा नुकतीच झाली. त्यात गेल्या गणेशोत्सवात व नवरात्रात लाईटींगचे काम करूनही त्याचे पैसे चुकते न करणाऱ्या थकबाकीदार मंडळांचा मुद्दा उपस्थित झाला.
जळगाव : गेल्या गणेशोत्सवात व नवरात्रात लाईटींगच्या केलेल्या कामाचे पैसे बुडविणाऱ्या मंडळांवर यावर्षी बहिष्कार टाकण्याचा निर्णय लाईटींग डेकोरेटर्स असोसिएशनने घेतला आहे. दरवर्षी आठ ते दहा मंडळे पैसे बुडवत असल्याने लाईटींग व्यावसायिकांना काम करणे कठीण होत चालले आहे.
जळगाव लाईटींग डेकोरेटर्स असोसिएशनची वार्षिक सभा नुकतीच झाली. त्यात गेल्या गणेशोत्सवात व नवरात्रात लाईटींगचे काम करूनही त्याचे पैसे चुकते न करणाऱ्या थकबाकीदार मंडळांचा मुद्दा उपस्थित झाला. दरवर्षी आठ ते दहा मंडळे या पद्धतीने पैसे बुडवतात. मग काम कसे करायचे, असेही म्हणणे काहींनी मांडले. त्यामुळे ज्या गणेश मंडळांची जुनी थकबाकी असेल, त्यांचे लाईटींगचे काम कोणीच करू नये, असे सर्वानुमते ठरविण्यात आले.
महागाईमुळे दरवाढ...
दरवर्षी महागाई वाढत असल्यामुळे असोसिएशनचे अध्यक्ष रोहित चौरसिया यांनी लाईटींगच्या कामाचे दर ३० ते ५० टक्क्यांनी वाढवावे, अशी घोषणा केली. बाहेरगावहून येणाऱ्या कारागिरांची मजुरी, वायर, लाइट बल्ब, टेप, सुतळी व गाडी यांचेही दर वाढविण्याचे ठरविण्यात आले. असोसिएशनचे सचिव जयेश खंदार, उपाध्यक्ष संतोष दप्तरी, पदाधिकारी निखील चौरसिया, गजानन परदेशी, दीपक कुलकर्णी, अयुब तांबोळी, नीलेश कौशल, असिफ भिस्त्री आदी उपस्थित होते.
दरवर्षी आठ ते दहा मंडळे थकबाकीदार
काही मंडळे लाईटींगच्या कामाचे पैसे देत नाहीत. काम ठरवायचे, सुरुवातीला त्याचे ५० टक्के पैसे द्यायचे. उर्वरित रकमेबाबत नंतर मात्र हात वर करायचे, असे अनुभव येतात. पदाधिकारी बदलले की, मागचे आम्हाला माहित नाही, असे सांगून त्यांच्याकडूनही पैसे देणे टाळले जाते. आर्थिक जमा-खर्चाचा ताळमेळ लागत नाही, जमा वर्गणीपेक्षा खर्चच जास्त झालेली मंडळेही पैसे देण्यात टाळाटाळ करतात. दरवर्षी आठ ते दहा मंडळांकडे पैसे अडकतात, अशी माहिती असोसिएशनचे उपाध्यक्ष संतोष दप्तरी यांनी दिली.
मंडळाच्या सदस्यांचीही कामे नाकारली होती...
मंडळांकडील थकबाकीचा मुद्दा बराच जुना आहे. सन २०१९ मध्ये जळगाव शहरातील एका प्रसिद्ध गणेश मंडळांकडून थकित बिल मिळत नसल्याने लाईटींग असोसिएशनने कडक भूमिका घेत त्या मंडळाची व त्यांच्या सदस्यांच्या घरची लाईटींगची कामे घेणे बंद केले. त्यानंतर मंडळाच्या सदस्यांनी थकित रक्कम जमा करून दिली होती.
लाईटींगचा प्रकार - भाडेदर
व्हाईट फोकस - १२५ रुपये प्रतिदिवस
पार लाईट - १५० रुपये प्रतिदिवस
हजार बल्बची लाईटींग - किमान ४००/६०० रुपये प्रतिदिवस प्रकारानुसार
(वरील दरात ३० ते ५० टक्के वाढ होणार आहे.)