Jalgaon Breaking : वाळूमाफियांची मुजोरी, वाळू उपशाला विरोध केल्याने शेतकऱ्याला जबर मारहाण
By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2022 10:51 AM2022-01-14T10:51:56+5:302022-01-14T10:52:35+5:30
गिरणा नदीपात्रात घडली घटना.
जळगाव : जिल्ह्यात (Jalgaon) वाळू माफियांची मुजोरी काही केल्या कमी होत नसल्याचे पाहायला मिळत आहे. आज (शुक्रवारी) सकाळी ८ वाजेच्या सुमारास जळगाव तालुक्यातील आव्हाणे येथे गिरणा नदीपात्रात एक धक्कादायक घटना घडली. वाळू उपशाला विरोध केल्याने वाळूमाफियांनी एका शेतकऱ्याला जबर मारहाण केली. मारहाणीत शेतकरी बेशुद्ध झाल्याने वाळूमाफियांनी नदीपात्रातच दोन ट्रॅक्टर सोडून पोबारा केला आहे.
मनोहर चौधरी (रा. आव्हाणे, ता. जळगाव) असं मारहाण झालेल्या शेतकऱ्याचं नाव आहे. या घटनेसंदर्भात मिळालेल्या माहिती अशी की, मनोहर चौधरी यांचे गिरणा नदी पात्रालगत शेत आहे. वाळूमाफिया नदीपात्रातून वाळू उत्खनन केल्यानंतर वाळूने भरलेले ट्रॅक्टर तसंच डंपर त्यांच्या शेतातून नेत होते. शेतात रस्ता तयार होत असल्याने मनोहर चौधरी यांनी वाळू माफियांना विरोध केला असता वाद झाला. त्यात वाळूमाफियांनी चौधरी यांना जबर मारहाण केली. मारहाणीत चौधरी हे बेशुद्ध झाले. त्यानंतर त्यांच्या नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली. आव्हाणेतील काही ग्रामस्थ देखील घटनास्थळी आले. त्यामुळे वाळूमाफियांनी गिरणा नदीपात्रात दोन ट्रॅक्टर सोडून पोबारा केला. या घटनेनंतर ग्रामस्थांनी तहसीलदार तसेच पोलीस प्रशासनाला याची माहिती देण्यात आली. त्यानंतर महसूल विभागाचे अधिकारी नदीपात्रात दाखल झाले.
'वाळूमाफियांसमोर प्रशासनानं टेकले हात'
गिरणा नदी पात्रातून वाळू चोरणाऱ्या माफियांची दादागिरी दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. प्रशासनाने वाळूमाफियांसमोर अक्षरशः हात टेकले आहेत, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. वाळू माफियांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा, अशी मागणी गिरणा पट्ट्यातील ग्रामस्थांनी केली आहे.