जळगाव बसस्थानकावर ४५० किलो खवा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2019 01:07 PM2019-10-18T13:07:18+5:302019-10-18T13:08:00+5:30
उघड्यावर अस्वच्छ ठिकाणी आढळला खवा
जळगाव : जळगाव बसस्थानक परिसरात उघड्यावर अस्वच्छ ठिकाणी पाच तास पडून असलेला तब्बल ४५० किलो खवा अन्न व औषध प्रशासनाने जप्त केला. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या या पहिल्याच कारवाईत ७० हजार रुपयांचा खवा आढळून आला. खव्याचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. अहवाल आल्यानंतर संबंधितांवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाच्यावतीने देण्यात आली.
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर भेसळयुक्त खव्याची मोठ्या प्रमाणात आवक होते. त्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासन विभागाच्यावतीने मोहीम हाती घेण्यात आली असून गुरुवारी भेसळयुक्त खवा शहरात आल्याच्या संशयावरून बसस्थानकावर तपासणी करण्यात आली. त्या वेळी बसस्थानक परिसरात अस्वच्छ ठिकाणी उघड्यावर खवा ठेवल्याचे आढळून आले. दुग्धजन्य व नाशवंत पदार्थ असलेला खवा ठराविक तापमानात ठेवणे गरजेचे असताना पहाटे पाच वाजेपासून पाच तास हा खवा उघड्यावर पडलेला होता. याची माहिती मिळताच अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त वाय.के. बेंडकुळे यांच्यासह अन्न सुरक्षा अधिकारी विवेक पाटील, नमुना सहायक चंद्रकांत सोनवणे, समाधान बारी, प्रवीण धोंडकर यांनी तपासणी केली. यात ४५० किलो खवा अस्वच्छ ठिकाणी आढळून आला.
शहरातील तीन विक्रेत्यांचा हा खवा असून तो बाहेरगावाहून एस.टी. बसने आल्याची माहिती मिळाली. हा खवा नष्ट करण्याची प्रक्रिया सुरू आहे. अहवाल आल्यानंतर तीनही विक्रेत्यांवर कारवाई केली जाणार असल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान, सणासुदीच्या काळात भेसळयुक्त खव्याची आवक वाढण्याची शक्यता असून त्या पार्श्वभूमीवर तपासणी मोहीम हाती घेण्यात आली असल्याचे विवेक पाटील यांनी सांगितले.