जळगाव शहरात तीन दिवसात ५८७ मुलांना गोवर, रुबेला लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2018 11:55 AM2018-12-01T11:55:40+5:302018-12-01T11:56:24+5:30
४ डिसेंबरपासून शाळांमध्ये लसीकरणास सुरुवात
जळगाव : मुलांचे आरोग्य सुदृढ राहावे यासाठी आरोग्य विभागाच्यावतीने देण्यात येणाऱ्या गोवर-रुबेला लसीकरण मोहीमेस सुरुवात झाल्यानंतर शहरातील पाच रुग्णालयांच्यामाध्यमातून शुक्रवारपर्यंत ५८७ मुलांना गोवर, रुबेलाची लस देण्यात आली. पाच आठवडे चालणाºया या लसीकरण मोहिमेंतर्गत ४ डिसेंबरपासून शाळांमध्ये लसीकरणास सुरुवात करण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य विभागाच्यावतीने देण्यात आली.
अत्यंत संक्रमक व घातक असलेल्या गोवर आजाराचे तसेच त्या मानाने सौम्य संक्रमक आणि मुलांना तसेच प्रौढ व्यक्तींनादेखील होणाºया रुबेला या आजारांचे निर्मूलन करण्यासाठी गोवर-रुबेला लसीकरण मोहीमेस सुरुवात झाल्यानंतर शहरातील मनपाच्या डी.बी. जैन रुग्णालय, चेतनदास मेहता रुग्णालय, नानीबाई रुग्णालय, छत्रपती शाहू महाराज रुग्णालय आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयामधून लसीकरण केले जात आहे. त्यात शुक्रवारपर्यंत ५८७ मुलांना लस देण्यात आली. यामध्ये २८ नोव्हेंबर रोजी २०० मुले, २९ रोजी १९१ आणि ३० रोजी १९६ मुलांना लसीकरण करण्यात आल्याची माहिती आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. राम रावलानी यांनी दिली.
मिशन इंद्रधनुष्य मोहिम संपल्यानंतर शाळांमध्ये सुरुवात
नियमित लसीकरणापासून वंचित राहिलेल्या शून्य ते दोन वर्षे वयोगटातील बालकांना सध्या मिशन इंद्रधनुष्य अंतर्गत लसीकरण करण्यात येत आहे. ते संपल्यानंतर ४ डिसेंबरपासून शहरातील शाळांमध्ये गोवर-रुबेला लसीकरणास सुरुवात करण्यात येणार आहे.
प्रत्येक मुलाला लस मिळेपर्यंत मोहीम सुरू राहणार
या मोहिमेंतर्गत ५ आठवड्यात लसीकरण करण्यात येणार आहे. रुग्णालय, शाळांमध्ये लसीकरण सत्र राबविण्यात येऊन उर्वरित लाभार्थ्यांना अंगणवाडी केंद्र व बाह्य लसीकरण सत्र, जोखमीच्या भागामध्ये व विविध संस्थेतील सत्रामध्ये गोवर रुबेला लसीकरण करण्यात येणार आहे. असे असले तरी एकही मुलगा यापासून वंचित राहू नये म्हणून प्रत्येत मुलाला लसीकरण होईपर्यंत ही मोहीम सुरू राहणार आहे.
पालकांकडून बालरोग तज्ज्ञांकडे विचारणा
गोवर-रुबेला लसीकरणाबाबत पालकांमध्ये भीतीचे वातावरण असल्याने ते बालरोग तज्ज्ञांकडे विचारणा करीत आहेत. अनेक पालकांनी याबाबत संमती दर्शविली असली तरी मुलांना लस दिली असल्याने पुन्हा द्यावी की नाही, या बाबत संभ्रमात आहेत. त्यात सोशल मीडियावर असणाºया वेगवेगळ््या संदेशांमुळे पालक भयभीत होत असल्याचे सांगितले जात आहे.
सर्वांना लस द्या
मुलांना इतर लस दिल्या असल्या तरी गोवर रुबेला लसीकरण मोहिमेंतर्गत लसीकरण करावे, त्याचा काहीही परिणाम होणार नाही, असे आवाहन आरोग्य विभागाच्यावतीने करण्यात येत आहे.
एक महिन्याचा खंड असावा
मुलांना इतर लस दिल्या असल्या तरी हे लसीकरण करता येऊ शकते, मात्र गोवरच्या लसमध्ये किमान एक महिन्याचा खंड असावा, असे बालरोग तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
पालकांनी घाबरू नये
हे लसीकरण केल्यानंतर कोणत्याही लसीकरणानंतर येणारा ताप येऊ शकतो अथवा पूरळ येऊ शकतात. मात्र पालकांनी त्याबाबत भीती बाळगू नये, असे आवाहन बालरोग तज्ज्ञांनी केले आहे. ताप आल्यास औषधी देऊन तो कमी होऊ शकतो व पूरळ आल्यास त्यासाठी औषधोपचाराची आवश्यकता नसल्याचे सांगण्यात आले.
बालरोग तज्ज्ञांचे सहकार्य या मोहिमेसंदर्भात शुक्रवारी छत्रपती शाहू महाराज रुग्णालयात मनपाच्यावतीने डॉ. राम रावलानी यांच्या उपस्थितीत बालरोग तज्ज्ञांची बैठक घेण्यात आली. यामध्ये पालकांच्या मनातील भीती दूर करण्यासह लसीकरणांतर्गत येणाºया अडचणींसदर्भात संपूर्ण सहकार्य केले जाणार असल्याचे बैठकीत सांगण्यात आले.
आयएमएचा पाठिंबा
गोवर-रुबेला लसीकरण मोहिमेस इंडियन मेडिकल असोसिएशननेदेखील पाठिंबा दिला असून आवश्यक ती मदतीची तयारी दर्शविली आहे. या संदर्भात मनपाच्या आरोग्य विभागाने आयएमए सोबत बैठकही घेतली होती. आरोग्य विभागाकडून ‘मायक्रोप्लॅन’ गोवर-रुबेला लसीकरण मोहिमेसाठी मनपाच्यावतीने मायक्रोप्लॅन तयार करण्यात आला असून ४ डिसेंबरपासून दररोज कोणत्या शाळेत लसीकरण असेल याचे नियोजन केले आहे. तसेच त्या-त्या भागातील आरोग्य अधिकाºयांना सूचना देऊन नियोजन करण्यात आले असल्याचे सांगण्यात आले.
जिल्ह्यात १ लाख ४३ हजार मुलांना लस
मोहीम सुरु झाल्यानंतर चार दिवसांत जिल्ह्यात १ लाख ४३ हजार मुलांना लस देण्यात आल्याची माहिती देण्यात आली.
गोवर रुबेला लसीकरण मोहिमेचा लाभ सर्व नागरिकांनी घेऊन आपल्या ९ महिने ते १५ वर्षापर्यंतच्या सर्व मुला व मुलींना गोवर रुबेलाची लस द्यावी. या बाबत पालकांनी भीती बाळगू नये.
- डॉ. राम रावलानी, आरोग्य वैद्यकीय अधिकारी, मनपा.
गोवर-रुबेला लसीकरण मोहिमेबाबत पालकांमध्ये शंका असल्याने ते विचारणा करण्यासाठी येत आहे. आतापर्यंत कोणालाही त्रास झाल्याचे सांगण्यात आलेले नाही.
- डॉ. विश्वेश अग्रवाल, बालरोग तज्ज्ञ
गोवर-रुबेला लसीकरण मोहिमेबाबत पालकांमध्ये भीती असल्याने ते या बाबत विचारणा करीत आहेत. मुलांना ही लस देण्यास काहीही हरकत नाही.
- डॉ. राजेश पाटील, बालरोग तज्ज्ञ.
गोवर-रुबेला लसीकरण मोहिमेसंदर्भात बैठक झाली असून या राष्ट्रीय मोहिमेस आयएमएने पाठिंबा दिला आहे.
- डॉ. विलास भोळे, सचिव, आयएमए, जळगाव.
पालकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. या लसीकरणामुळे दुष्परिणाम नाही. प्रत्येक मुलाला लसीकरण करावे.
- डॉ. हेमंत पाटील, अध्यक्ष, बालरोग तज्ज्ञ संघटना.