जळगाव शहर विधानसभा मतदार संघासाठी युतीच्या उमेदवाराचा शोध सुरू - गिरीश महाजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2019 01:12 AM2019-07-28T01:12:00+5:302019-07-28T01:12:40+5:30

भजी महोत्सवात युती कायम राहणार असल्याची घोषणा

Jalgaon city assembly constituency search for candidate for coalition - Girish Mahajan | जळगाव शहर विधानसभा मतदार संघासाठी युतीच्या उमेदवाराचा शोध सुरू - गिरीश महाजन

जळगाव शहर विधानसभा मतदार संघासाठी युतीच्या उमेदवाराचा शोध सुरू - गिरीश महाजन

Next

जळगाव : भाजप-शिवसेनेची युती अभेद्यच असून यापुढेही ती कायम राहणार आहे. जळगाव शहर विधानसभा मतदार संघासाठी आता युतीच्या उमेदवाराचा शोध सुरू असल्याची घोषणा जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी शनिवारी संध्याकाळी मेहरुण चौपाटीवर केली. त्यामुळे उमेदवार आता भाजपचा राहणार की शिवसेनेचा अशी चर्चा होऊ लागली आहे.
मराठी प्रतिष्ठान व सुबोनिया सो टेस्टी यांच्या संयुक्तविद्यमाने शनिवारी संध्याकाळी मेहरुण तलावाच्या काठी भजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी ते पत्रकारांशी बोलत होते.
महोत्सवला महाजन यांच्यासह माजी मंत्री सुरेशदादा जैन, माजी खासदार ईश्वरलाल जैन, आमदार सुरेश भोळे, माजी महापौर ललित कोल्हे, विष्णू भंगाळे, नगरसेवक कैलास सोनवणे, मनपाचे विरोधी पक्षनेते सुनील महाजन, भारती सोनवणे, अतुल हाडा, अमर जैन, जितेंद्र मुंदडा, मराठी प्रतिष्ठानचे अध्यक्ष अ‍ॅड. जमील देशपांडे, उपाध्यक्ष विजय वाणी यांच्यासह विविध संस्थाचे पदाधिकारी तसेच नागरिक उपस्थित होते.
अभेद्य युतीचा केक कापला
या भजी महोत्सवाचे वैशिष्ट म्हणजे या महोत्सवात सत्ताधाऱ्यांसह मनपातील सत्ताधारी व विरोधक तसेच राष्ट्रवादीच्या नेत्यांनी एकमेकांना भजी भरविली. तत्पूर्वी या महोत्सवाच्या प्रारंभी ‘अभेद्य युती’ असा उल्लेख असलेला केक गिरीश महाजन, सुरेशदादा जैन, ईश्वरलाल जैन यांच्याहस्ते कापण्यात आला. यानंतर तो तिघांनी एकमेकांना भरविला. विधानसभा निवडणुकीपर्यंत हा गोडवा आणि भाजप व सेनेची युती कायम राहणार असल्याचीही घोषणा केली.
युतीची भजी
पत्रकारांशी बोलताना महाजन म्हणाले की, याठिकाणी भगव्या व हिरव्या अशा दोन्ही रंगाची भजी असून ही भाजप व सेनेच्या युतीची भजे असल्याचा उल्लेख केला. आम्ही सर्व एकत्रित असून आमच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे मतभेद नाहीत, असे सांगून जळगावच्या विकासाठी आम्ही एकत्र असल्याचे जाहीर केले. युती राहणार त्यासाठी उमेदवाराचा शोध सुरू असल्याचेही त्यांनी जाहीर केले.
उमेदवार कोणाचा?
जळगाव शहर मतदार संघासाठी कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे सुरेशदादा जैन हे निवडणूक लढविणार असल्याचे जाहीर झाले होते. त्यानंतर भाजपचे आमदार सुरेश भोळे हे राहणार असल्याचीही चर्चा सुरू झाली. मात्र शनिवारी गिरीश महाजन यांनी युतीच्या उमेदवाराचा शोध सुरू असल्याचे सांगितल्याने उमेदवार भाजपचा राहणार की शिवसेनेचा अशी चर्चा होऊ लागली आहे.
जो उमेदवार असेल त्याचा प्रचार करणार
सुरेशदादा जैन म्हणाले की, आम्ही आज या महोत्सवात अभेद्य युतीचा केक कापला आहे. या अभेद्य युतीच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्राच्या समोर असून महाराष्ट्राप्रमाणेच आम्ही जळगावच्याही विकासासाठी सर्व मिळून प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी कोणालाही मिळो, त्यांचा प्रचार केला जाईल, असेही सुरेशदादांनी स्पष्ट केले. एकमेकांना केक भरविला असून त्याचा गोडवा भावी आमदारांमध्येही कायम राहणार असल्याचे सुरेशदादा म्हणाले. विनाकारण कोणी भांडणे लावू नये, असेही आवाहन त्यांनी केले.
गिरीश महाजन यांना नेहमीच आशीर्वाद - ईश्वरलाल जैन
जामनेरचा विकास व्हावा हा माझा प्रामाणिक उद्देश आहे आणि तो विकास गिरीश महाजन करीत असतील तर त्यांना माझा नेहमीच आशीर्वाद असल्याचे ईश्वरलाल जैन यांनी सांगितले.
लहानपणापासूनच बाबुजींच्या हातचे भजी खातोय - गिरीश महाजन
ईश्वरलाल जैन व गिरीश महाजन यांनी एकमेकांना भजी भरवावी, असा आग्रह झाल्यानंतर मी लहानपणापासूनच बाबुजींच्या हातचे भजी खात असल्याचे गिरीश महाजन म्हणाले. त्यामुळे हंशा पिकला.
मिरची आमदारांना
या महोत्सवात ईश्वरलाल जैन व आमदार सुरेश भोळे यांनी एकमेकांना तर सुरेशदादा जैन व गिरीश महाजन यांनी एकमेकांना भजी भरविली. त्या वेळी मिरची आली असता सुरेशदादा व महाजन यांनी दोघांनीही ती न खाता आमदार सुरेश भोळे यांना खाऊ घातली.
१५ प्रकारचे गरमागरम भजे
मेहरुण तलावाच्या निसर्गरम्य वातावरणात कोसळणाºया पावसाच्या सरीमध्ये शहरवासीयांनी विविध १५ प्रकारचे गरमागरम भजे, गुळाची गरम जिलेबी, वाफाळणारा चहा यांचा आस्वाद घेतला. भजी महोत्सवात बटाटे, पालक, मिरची, गिलके अशा वेगवेगळ्या १५ प्रकारची भजे होती.
मंत्र्यांनीही काढली सेल्फी
या महोत्सवात भजे खाण्यासाठी खवय्यांनी मोठी गर्दी केली होती. सोबतच सेल्फी पॉईंटवरही गर्दी केली होती. मंत्री महाजन यांच्यासह पदाधिकाऱ्यांनीही याठिकाणी सेल्फी काढला.

Web Title: Jalgaon city assembly constituency search for candidate for coalition - Girish Mahajan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव