जळगाव शहरात आमदार डॉ.सतीश पाटील यांच्या वाहनावर हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2018 10:27 PM2018-02-25T22:27:55+5:302018-02-25T22:27:55+5:30
शहरात लग्नाला येत असताना महामार्गावरील मानराज पार्कजवळ पारोळ्याचे राष्टÑवादी काँग्रेसचे आमदार डॉ.सतीश पाटील यांच्या वाहनावर चालकाच्या दिशेने रविवारी दुपारी साडे तीन वाजता दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी फायटरने हल्ला केला. या हल्लयात कोणालाही दुखापत झाली नसली तरी हा हल्ला पूर्वनियोजित असल्याचे डॉ.पाटील यांनी ‘लोकमत’ ला सांगितले.
आॅनलाईन लोकमत
जळगाव दि, २५ : शहरात लग्नाला येत असताना महामार्गावरील मानराज पार्कजवळ पारोळ्याचे राष्टÑवादी काँग्रेसचे आमदार डॉ.सतीश पाटील यांच्या वाहनावर चालकाच्या दिशेने रविवारी दुपारी साडे तीन वाजता दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी फायटरने हल्ला केला. या हल्लयात कोणालाही दुखापत झाली नसली तरी हा हल्ला पूर्वनियोजित असल्याचे डॉ.पाटील यांनी ‘लोकमत’ ला सांगितले.
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, आमदार डॉ.सतीश पाटील हे कारने (क्र.एम.एच.१५ इ.एक्स ९००९) रविवारी दुपारी जळगाव शहरात लग्नाला येत होते. चालक गुलाब पाटील यांच्या बाजूलाच डॉ.पाटील बसले होते तर मागील सीटवर अंगरक्षक कोकणे व स्वीय सहायक भैय्या माणिक पाटील हे बसले होते. दुपारी साडे तीन वाजता महामार्गावर मानराज पार्क ओलांडल्यानंतर रेल्वे उड्डापुलाजवळ दुचाकीवरुन समोरुन दोन जण आले. त्यापैकी दुचाकी चालविणाºयाने हात बाहेर काढला असल्याने कार चालकाने त्याला धक्का लागू नये म्हणून कार थोडी बाजूला घेतली, याचवेळी दुचाकीस्वाराने चालकाच्या दिशेने फायटरने जोरदार हल्ला केला.
हल्लयानंतर ठोकली धूम
हल्लेखोर तरुणाने हेल्मेट परिधान केले होते तर मागे बसलेल्याने चेहरा लपविला होता. कारमध्ये पोलीस दिसताच हल्लेखोरांनी तेथून धूम ठोकली. या घटनेत चालकाच्या अंगावर काच पडली, सुदैवाने कुठेही दुखापत झाली नाही. चालकाचे नियंत्रण सुटले असते तर कार थेट रस्त्याच्या खाली कोसळली असती. घटनास्थळ अपघातक्षेत्र आहे. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.
पोलीस अधीक्षकांना दिली माहिती
घटना घडल्यानंतर आमदार पाटील हे जळगाव शहरातील काम आटोपून पारोळा येथे गेले. तेथून पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांना भ्रमणध्वनीवरुन घटनेची माहिती दिली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून हल्लेखोरांचा शोध घेण्याचे आश्वासन कराळे यांनी दिल्याचे पाटील यांनी सांगितले. दरम्यान, याप्रकरणी पारोळा पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून ती शून्य क्रमांकाने जिल्हा पेठ पोलिसात वर्ग होणार आहे.