प्रभू श्रीरामाच्या जयघोषाने निनादले जळगाव शहर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2018 07:25 PM2018-03-25T19:25:33+5:302018-03-25T19:25:33+5:30

रामनवमीनिमित्त आयोजित भव्य शोभायात्रेने वेधले लक्ष

Jalgaon City celebrates Lord Shriram navmi | प्रभू श्रीरामाच्या जयघोषाने निनादले जळगाव शहर

प्रभू श्रीरामाच्या जयघोषाने निनादले जळगाव शहर

Next
ठळक मुद्दे ढोल-ताशाच्या गजरावर भगवे झेंड घेऊन थिरकणारे युवक ठरले आकर्षण आकर्षक देखावे, रोप मल्लखांबची प्रात्यक्षिकेही सादरमहाआरतीने झाला समारोप

जळगाव: सार्वजनिक श्रीराम जन्मोत्सव समितीतर्फे श्रीराम नवमीनिमित्त आयोजित भव्य शोभायात्रेने नागरिकांचे लक्ष वेधले. मिरवणुकीत सहभागी वाहनांवरील आकर्षक देखावे, रोप मल्लखांबची सादर होणारी प्रात्यक्षिके, ढोल-ताशांच्या गजरावर भगवे झेंडे घेऊन थिरकणारे युवक या शोभायात्रेचे आकर्षण ठरले. प्रभू श्रीरामाच्या जयघोषाने शहर निनादले.
श्रीराम नवमीनिमित्त रविवार, २५ रोजी शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. तर सार्वजनिक श्रीराम जन्मोत्सव समितीतर्फे दुपारी वाजता गोलाणी मार्केटजवळील दक्षीणमुखी हनुमान मंदिरापासून ते जुने जळगावातील ग्रामदैवत श्रीराम मंदिरापर्यंत भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. दुपारी ४ वाजेच्या सुमारास महापौर ललित कोल्हे, आमदार सुरेश भोळे, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन सांगळे, माजी आमदार आर.ओ.पाटील, सुनील भंगाळे, गितेश पवार, भगवतीप्रसाद मुंदडा, आदींच्या हस्ते आरती करून या शोभायात्रेस प्रारंभ झाला. त्यात विविध मंडळे, सामाजिक मित्र मंडळ व धर्मप्रेमी जनतेने सहभाग घेतला.
रोप मल्लखांबने वेधले लक्ष
मिरवणुकीच्या सर्वात पुढे युवाशक्ती फाऊंडेशनतर्फे मोठ्या क्रेनला दोर बांधून त्यावर काही लहान मुलींमार्फत रोप मल्लखांबची प्रात्यक्षिक सादर केली जात होती. त्यासाठी प्रत्येक चौकात पोहोचल्यावर तेथे रस्त्यावर गाद्या टाकून हे प्रात्यक्षिक सादर केले जात होते. या चित्तथरारक प्रात्यक्षिकांनी लोकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले.
विविध मंडळांचा सहभाग
मिरवणुकीत जुने जळगाव बहुउद्देशीय मंडळाने श्रीराम पादुका व रामसेतू दर्शन देखावा सादर केला होता. प्रभू श्रीराम, लक्ष्मण व सीतेची मूर्ती तसेच त्यासमोर काचेच्या भांड्यात पाण्यात रामसेतूचे पाण्यात तरंगणारे दोन दगड ठेवण्यात आले होते. भाविक तेथे येऊन त्याचे दर्शन घेत होते. नेहरू चौक मित्र मंडळ, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, जानकीनगर मित्र मंडळ, युवा शक्ती फाऊंडेशन, जय श्रीराम बहुउद्देशीय संस्था, पंचमुखी हनुमाननगर, आदी विविध मंडळे ट्रॅक्टरवर प्रभू श्रीरामाची मूर्ती अथवा फोटो ठेवून मंडळाचे कार्यकर्ते त्यापुढे ढोल-ताशांच्या गजरात नृत्य करताना दिसत होते. गोलाणी मार्केटजवळील दक्षिणमुखी हनुमान मंदिरापासून शोभायात्रेला प्रारंभ झाला. तेथून चित्राचौक, दाणाबाजार, सुभाष चौक, सराफबाजार,रथचौक मार्गे जुने जळगावातील ग्रामदैवत श्रीराम मंदिरापर्यंत पोहोचली. श्रीराम मंदिर संस्थानचे विद्यमान गादिपती मंगेश महाराज तसेच अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत महाआरती होऊन समारोप झाला.
विविध मंडळांकडून पाणी व सरबत वाटप
विविध मंडळांकडून शोभायात्रेत सहभागी कार्यकर्ते व भाविकांसाठी पाणी पाऊच तसेच सरबताचे वाटप करण्यात आले. दाणाबाजारच्या कोपऱ्यावर काँग्रेस भवन येथील दत्तमंदिरातर्फे सरबत वाटप करण्यात आले.
आकर्षक रांगोळ्या, पताकांनी वातावरण निर्मिती
शोभायात्रेच्या मार्गावर नागरिकांनी आकर्षक रांगोळ्या काढल्या होत्या. तसेच विविध मंडळे, संघटनांनी शुभेच्छांचे फलक, पताका लावल्या होत्या. त्यामुळे वातावरणात अजूनच उत्साह निर्माण होत होता.
यशस्वीतेसाठी समितीचे सचिन नारळे, किशोर भोसले, ललित चौधरी, बंटी नेरपगारे, मुकुंद मेटकर, शामकांत सोनवणे, शरद तायडे, सुरज दायमा, राकेश लोहार, विराज कावडिया, अमित जगताप, अजय गांधी, प्रभाकर पाटील व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

Web Title: Jalgaon City celebrates Lord Shriram navmi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.