भगवान महावीर स्वामीच्या जयघोषाने दुमदुमले जळगाव शहर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2019 01:12 PM2019-04-17T13:12:04+5:302019-04-17T13:12:30+5:30
नेत्रदीपक शोभायात्रा
जळगाव - भगवान महावीर स्वामी जयंतीचा जळगाव शहरात उत्साह असून सकाळपासूनच विविध कार्यक्रमांना सुरुवात झाली. या निमित्त काढण्यात आलेल्या भव्य शोभायात्रने शहरवासीयांचे डोळ््यांचे पारणे फेडले.
गेल्या पाच दिवसांपासून शहरात भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सवाच सुरू असून मुख्य सोहळा १७ रोजी साजरा होत आहे. सकाळी साडेसात वाजता काँग्रेस भवन समोरील श्री वासूपूज्य जैन मंदिरात ध्वजवंदनाने त्यास सुरुवात झाली. त्यानंतर याच ठिकाणाहून भव्य शोभायात्रेला (वरघोडा) सुरुवात झाली. बालगंधर्व नाट्यगृहाजवळ शोभायात्रेचा समारोप होऊन त्या ठिकाणी मंगलाचरण, स्वागत गीत, सामूहिक ध्वजारोहण, भगवंतास पुष्पहार अर्पण, दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर ‘भगवान महावीर मेरे मॅनेजमेंट गुरु’ या विषयावर कोलकत्ता येथील जयश्री डागा यांनी मार्गदर्शन केले. माजी मंत्री सुरेशदादा जैन सोहळ््याच्या अध्यक्षस्थानी होते. या वेळी शाकाहार सदाचारचे प्रणेता रतनलाल बाफना, जैन उद्योग समुहाचे अध्यक्ष अशोक जैन, सकल जैन संघाचे अध्यक्ष दलुभाऊ जैन, श्री सकल जैन भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सव समितीचे प्रमुख अजय ललवाणी यांच्यासह सर्व पंथियांचे अध्यक्ष उपस्थित होते. या ठिकाणी रक्तदान शिबिर, मधुमेह तपासणी करण्यासह देहदानाचे अर्ज स्वीकारण्यात आले.