जळगाव शहरात आठ वर्षीय बालिकेचा गोणपाटात अर्धनग्न मृतदेह आढळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2018 01:13 PM2018-06-13T13:13:54+5:302018-06-13T13:13:54+5:30
समता नगरातील धामणगाववाडा भागातील टेकडीवर बुधवारी सकाळी साडेसहा वाजता अक्षरा उर्फ छकुली नरेश करोसिया (वय ८) या चिमुरडीचा मृतदेह गोणपाटात आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. या चिमुरडीचा डावा हात व पाय किरकोळ भाजलेला असून गोणपाटात आगपेटी व त्यावर काही तरी लिहिलेले असल्याने हा अघोरीकृत्याचा प्रकार असल्याचा संशय आहे.
आॅनलाईन लोकमत
जळगाव दि,१३ : समता नगरातील धामणगाववाडा भागातील टेकडीवर बुधवारी सकाळी साडेसहा वाजता अक्षरा उर्फ छकुली नरेश करोसिया (वय ८) या चिमुरडीचा मृतदेह गोणपाटात आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. या चिमुरडीचा डावा हात व पाय किरकोळ भाजलेला असून गोणपाटात आगपेटी व त्यावर काही तरी लिहिलेले असल्याने हा अघोरीकृत्याचा प्रकार असल्याचा संशय आहे.
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती की, समता नगरातील धामणगाववाड्यात आई मनिषा, भाऊ वर्धन व अंश अशांसह अक्षरा राहत होती. मंगळवारी गल्लीत खेळत असतानाच सायंकाळी साडे सहा वाजता ती गायब झाली. खेळणे झाले की मुलगी घरी येतेच म्हणून आईने सात वाजेपर्यंत तिची चौकशीच केली नाही. साडे सात वाजेनंतर मात्र तिचा शोध सुरु झाला. संपूर्ण समता नगर व टेकडीवर शोध घेतला, तरीही ती कुठेच आढळून आली नाही. चिंता अधिक वाढल्याने रात्री अकरा वाजता रामानंद नगर पोलीस स्टेशन गाठून मुलगी हरविल्याची तक्रार दिली.
समता नगर टेकडी भागात साडेसहा वाजता कचरा फेकायला गेलेल्या एका महिलेला पोत्यात मृतदेह आढळला. रात्री अक्षरा गायब झाल्याची या महिलेला माहिती असल्याने तिने जवळ जावून पाहिले तर तिचाच तो मृतदेह होता. घाबरलेल्या अवस्थेत या महिलेने अक्षराच्या घरी जावून आई मनिषाला माहिती दिली. त्यानंतर संपूर्ण गल्ली घटनास्थळी धावली. मुलीचा मृतदेह पाहून आईने हंबरडा फोडला.
श्वान पथकाने दाखविला माग..
घटनेचे गांभीर्य लक्षात घेता रामानंद नगर पोलीस स्टेशनचे निरीक्षक बी.जी.रोहोम यांनी सकाळीच घटनास्थळ गाठले. त्यानंतर श्वान पथक व ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले. श्वानने धामगणगाववाड्याला दोन वेळा माग दाखविला.
पोलिसांकडून कसून चौकशी
या घटनेनंतर स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील कुराडे, रामानंद नगरचे निरीक्षक बी.जी.रोहोम, उपनिरीक्षक रोहीदास ठोंबरे, प्रदीप चौधरी, गोपनीयचे राजेश पाटील यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळाची बारकाईने पाहणी करुन आपआपल्या स्तरावर चौकशी करायला सुरुवात केली. काही संशयित लोकांची कसून चौकशी करण्यात आली.