पहिल्याच पावसात जळगाव शहर ‘जल’मय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2019 01:15 PM2019-06-27T13:15:00+5:302019-06-27T13:15:32+5:30
एका तासात धो, धो धुतले
जळगाव : गेल्या १५ दिवसांपासून चातकाप्रमाणे वाट पाहिली जात असलेल्या मेघराजाने शहर परिसरात तब्बल एक तास हजेरी लावत संपूर्ण शहर जलमय करून टाकले. मात्र या दमदार हजेरीने सर्वत्र समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. या पावसामुळे अनेक ठिकाणच्या सखल भागात पाणी साचले होते.
मृग नक्षत्राला यंदा ८ जूनपासून प्रारंभ झाला. यंदा दुष्काळाच्या संकटाने हैराण झालेल्या जनतेला दमदार पावसाची प्रतीक्षा होती. या आठवड्यात एक, दोन वेळा पाऊस झाला, मात्र तो समाधानकारक नव्हता. उलट या पावसापाठोपाठ उकाड्याने जनता हैराण झाली होती. संपूर्ण मृग नक्षत्र पावसाच्या प्रतीक्षेत गेले. गेल्या आठवड्यात शनिवारी २२ पासून आर्द्रता नक्षत्रास सुरूवात झाली. या नक्षत्रात पाऊस पडेल याकडे सर्वच आशेने डोळे लावून होते.
नाल्याचे पाणी रस्त्यावर
श्रीकृष्ण कॉलनी, उदय कॉलनी भागातून वाहणाऱ्या नाल्याचे पाणी रस्त्यावर येऊन या भागातील वाहतूक ठप्प झाली होती. पाण्याचा प्रवाह वेगात असल्यामुळे नागरिकांनी रस्त्यावरच वाहने लावून पाणी कमी होण्याची वाट पाहिली. तब्बल ७.३० पर्यंत या भागात ही परिस्थिती होती. या भागातून जाणारा नाल्याची सफाई करण्यात यावी, अशी तक्रार आपण आपले सरकार पोर्टलवर केली होती, अशी माहिती या भागातील रहिवासी संजय भोकरडोळे यांनी दिली.
बेंडाळे चौकात झाड पडले
पुष्पलता बेंडाळे चौकातही एक झाड पडल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला होता. जेसीबीने हे झाड हटवून वाहतूक सुरळीत करण्यात आली.
बजरंग बोगद्यावरील वाहतूक थांबविली
बजरंग बोगदा अक्षरश: पाण्याखाली गेल्यामुळे या भागात वाहनांच्या रांगा लागून पिंप्राळा रेल्वेगेटकडे अनेकांनी आपला मोर्चा वळवून तेथून वाहने नेली. मात्र या ठिकाणी गर्दी झाल्यामुळे वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती. वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक देविदास कुनगर व अन्य १२ वाहतूक कर्मचाऱ्यांनी तब्बल एक तास या भागात थांबून वाहतूक सुरळीत केली.
जनमानस सुखावले
सायंकाळी ५.३० वाजेच्या दरम्यान सुरू झालेला हा पाऊस ६.३० पर्यंत म्हणजे तब्बल एक तास सुरू होता. उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना यामुळे बराच दिलास मिळाला, पहिल्याच दमदार हजेरीने जनमानस सुखावले. दरम्यान, नालेसफाई न झाल्याने रस्त्यावर पाणी साचले होते.
पावसाची दमदार हजेरी
बुधवारी सकाळपासून प्रचंड उकाडा व उन्हाचा चटका जाणवत होता. अंगावरून घामाच्या धारा वाहत असल्यामुळे जनमानस अस्वस्थ असताना सायंकाळी ५.३० वाजेच्या दरम्यान जोरदार वादळाला सुरूवात झाली. पावसाच्या वातावरणामुळे बाजारपेठेत आलेल्या नागरिकांची त्रेधा उडाली. वादळी वाºयामुळे शनिपेठ, सुभाष चौक भागात बाजारातील व्यावसायिकांनी लावलेले प्लॅस्टिक कागद, छत्र्या उडून गेल्या. वादळा पाठोपाठ जोरदार पावसाच्या सरी कोसळण्यास सुरूवात झाली. पाहता, पहाता विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाला सुरूवात झाली. बाजारापेठेत आलेल्या नागरिकांची यामुळे पळापळ सुरू झाल्याचे दृश्य दिसून आले.
वीज पुरवठा खंडीत
५.३० वाजता वादळ व त्या पाठोपाठ पाऊस सुरू झाल्याने वीज पुरवठाही खंडीत झाला होता. बºयाच भागात आठ वाजेपर्यंत वीज पुरवठा बंद होता तर काही भागात रात्री उशिरापर्यंत वीज पुरवठा सुरू न झाल्याने नागरिकांच्या तक्रारी सुरू होत्या.
बजरंग बोगदा परिसर जलमय
या पावसामुळे जुना व नवा बजरंग बोगदा पाण्याने भरल्याचे दृश्य दिसून आले. या भागात तब्बल दीड तास वाहने खाळंबली होती. परिसरात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. तर पुलावर रेल्वेही थांबून होती. या पुलातील पाण्यातून अनेकांनी वाहने टाकण्याचा प्रयत्न केला. त्यांची वाहने मध्येच बंद पडली.
खडसेंच्या घराजवळ वृक्ष उन्मळला
शिवराम नगर भागात माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या घरासमोर एक मोठा वृक्ष उन्मळून पडला होता, मात्र यात कुठलेही नुकसान झाले नाही. तात्काळ जेसीबी पाठवून हे झाड रस्त्यावरून बाजूला करण्यात आले.
विविध भागात तळे साचले
या पावसामुळे काव्यरत्नावली चौक, आकाशवाणी चौक, छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुलाचा परिसर, कोर्ट चौक, नवीपेठेतील बॅँक स्ट्रिट, बालगंधर्व खुले नाट्यगृह परिसर, डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यान परिसर, पुष्पलता बेंडाळे चौकापासून सिव्हील हॉस्पिटलकडे जाणारा रस्ता संपूर्ण जलमय झाला होता. गुडघ्यापर्यंत पाणी बºयाच ठिकाणी साचले होते. यात काही जाणारी-येणारी वाहनेही बंद पडली. एस.एम.आय.टी. कॉलेज जवळील नाला पावसामुळे दुथडी भरून वाहताना दिसत होता.